हिमायतनगर | प्रतिनिधी/ लोकशाही बळकट करण्यासाठी अचूक व त्रुटीमुक्त मतदार यादी आवश्यक असून, प्रत्येक पात्र मतदाराची नोंद मतदार यादीत होणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यामुळे शहरातील सर्व मतदारांनी चौपाटी परिसरात आयोजित करण्यात आलेल्या SIR (Special Intensive Revision) कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपल्या नावाची व माहितीची खात्री करून घ्यावी, असे आवाहन हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी केले आहे.
हिमायतनगर शहरातील चौपाटी परिसरात दि. 15 जुलै रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेल्या SIR कॅम्पला उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर, मंडळाधिकारी बी. एम. चव्हाण, सर्व नगरसेवक तसेच बीएलओ उपस्थित राहणार आहेत.
या कॅम्पमध्ये मतदारांना आपल्या नावाची पडताळणी करता येणार असून, आवश्यक दुरुस्त्या, नवीन नावांची नोंदणी तसेच इतर आवश्यक बाबींची पूर्तता करता येणार आहे. एकाही पात्र मतदाराचे नाव मतदार यादीतून वगळले जाणार नाही आणि अपात्र व्यक्तीचे नाव राहणार नाही, यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले.
शहरातील युवक, महिला व सर्व मतदारांनी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष शेख रफिकभाई, उपनगराध्यक्ष विनोद गुंडेवार तसेच सर्व नगरसेवकांनी केले आहे.
