डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेतून समाजाने लेखणी हातात घेतली - जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

• समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी
• जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक संपन्न 

#नांदेड दि. 13 एप्रिल :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून समाजातील नागरिकांनी लेखणी हातात घेतली आहे. त्यामुळे शिक्षणातून समाजाची मोठी प्रगती झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांचे विचार समाजात गेले पाहिजे. त्यासाठी आपण निरंतर वाचन केले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या अनुषंगाने समाजात शांतता व सलोखा राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे. त्याअनुषंगाने जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हादंडाधिकारी राहुल कर्डिले, महापौर श्रीमती कविता मुळे, पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांच्यासह जिल्हास्तरीय शांतता समितीचे विविध स्थायी- अस्थायी सदस्य, निमंत्रीत सदस्य, विविध धर्मगुरू, नागरिक, पत्रकार आदींची उपस्थिती होती. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्हा प्रशासनाने विविध चांगली व्यवस्था केली आहे. नांदेड जिल्हा हा चळवळीचा जिल्हा असून विविध सामाजिक कार्यक्रमात, प्रशासनात समाजाचा एकत्रीत सहभाग मोठा असतो. मोठ्या आवाजातील डिजे ऐवजी लेझीम सारखे उपक्रम हाती घेऊन तणाव कमी करुन आनंदात आपण जयंती उत्सव साजरे करू या, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले.  
  
जिल्ह्यात सीसीटीव्ही प्रणाली आवश्यक असून यासाठी प्रयत्न चालू आहेत. शांतता समितीच्या बैठकीत महिलांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न केला जाईल. नांदेड जिल्ह्यातील कायदा सुव्यस्थेबाबत बैठक काही दिवसात घेतली जाईल. यात विद्यार्थ्यांसह महाविद्यालयाचा सहभाग असेल. यावेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त जिल्ह्यात सर्व नागरिकांना जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी शुभेच्छा दिल्या.  

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर समाजाने चालावे. यासाठी समता, बंधुत्व, एकोप्यातून जयंती आपण साजरी करू या. जयंती काळात युवकांवर योग्य जबाबदारी दिली पाहिजे. उन्हापासून नागरिकांची काळजी घेतली पाहिजे. यासाठी मनपाचे सर्व सहकार्य राहील, असे महापौर कविता मुळे यांनी सांगितले.  

सर्वांच्या चांगल्या चर्चेतून योग्य नियोजन पोलीस प्रशासनाकडून केले जात आहे. मिरवणूक मार्गात, परिसरात संपूर्ण व्यवस्था चांगली राहील. मार्गात कोणताही अडथळा येणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेतली जाते. यासाठी पोलीस प्रशासन तत्‍पर असल्याचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी सांगितले. नांदेड जिल्ह्याची चांगली प्रतिमा कायम आहे. यासाठी आपल्या सर्वांचे योगदान मोलाचे आहे. कायदा सुव्यवस्था चांगली ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण उत्साहात साजरी करू या. यासाठी पोलीस प्रशासनाने योग्य नियोजन केले आहे. नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ 112 या टोलफ्री नंबरवर संपर्क साधावा. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त युवक-विद्यार्थ्यांसाठी 18 तास अभ्यासाचा उपक्रम पोलीस प्रशासनाच्यावतीने साजरा केला जाणार आहे. यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या विविध सूचनेसह नागरिकांना जयंती काळात कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता मनपाकडून घेतली जाईल, असे मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी सांगितले. यावेळी बैठकीत विविध सदस्यांनी उपयुक्त सूचना दिल्या. मिरवणुकीद्वारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनेक नागरिक बाहेर पडतात. त्यांची सुरक्षा, आरोग्य, पाणी व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरा, स्वच्छता आदी विषयांबाबत सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. विविध विभागांने करावयाच्या व्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा या बैठकीत करण्यात आली.

निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी प्रास्ताविकात बैठकी विषयी माहिती दिली तर सदस्य सचिव तथा अपर पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी नांदेड जिल्ह्यात शांतता कायम राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. त्याअनुषंगाने शांतता समितीची बैठक शांततेत पार पडली असून उपस्थित सर्व सदस्यांचे शेवटी त्यांनी आभार मानले. 
00000

Maharashtra DGIPR विभागीय माहिती कार्यालय, लातूर DDSahyadri Doordarshan National (DD1)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.