हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव हिमायतनगर तालुक्यात मुख्य रस्त्यासह पर्यटन विकास निधी शासकीय इमारतीचे काम बोगस करून लाखो रुपये उकळण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू झाला असुन बोगस कामे करून निधी लाटण्यासाठी गुत्तेदारांनी चंग बांधला आहे.दोन्ही तालुक्यात सुरू असलेल्या कामाकडे शासकीय यंत्रणेने दुर्लक्ष केले असल्याने गुत्तेदार चांदी करीत बोगस कामे करून उखळ पांढरे करीत असल्याचा आरोप माजी खा.सुभाषराव वानखेडे यांनी केला आहे.परमेश्वर मंदिर परिसरात पन्नास लाख रुपयांतुन झालेल्या सुशोभीकरणाचे काम दहा लाखात गुंडाळल्याने वानखेडे संतापले असुन जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन चौकशी लावणार असल्याचे दैनिक पुण्यनगरी बोलताना सांगितले आहे.
हिमायतनगर शहरातील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिर परिसरात 50 लाख रुपयांच्या निधी खर्च करून करण्यात आलेल्या पेव्हर ब्लॉक टिनसेडचे काम अंत्यत बोगस झाले असल्याचा आरोप माजी खा सुभाष वानखेडेनी केला.प्रत्यक्ष पाहणीनंतर वानखेडे यांनी संबंधित अभियंत्यांना या कामाबद्दल सुनावले आहे.सदरील काम दहा लाखात गुंडाळल्याने कामाची चौकशी करून गुत्तेदार व एजन्सीवर दंडात्मक कार्यवाही करावी यासाठी जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहे.लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मंदिर परिसतील काम बोगस करण्यास गुत्तेदार महाशय घाबरत नसतील तर इतर ठिकाणच्या कामाची काय अवस्था असावी असा सवाल वानखेडे यांनी केला आहे.
हदगाव हिमायतनगर तालुक्यात गेल्या काही वर्षांत अनेक गुत्तेदार निर्माण झाले असुन लोकप्रतिनिधी व शासनाकडून चांगल्या दर्जाची कामे करण्यासाठी निधी दिला जातो एकदा निधी दिल्यानंतर दहा वर्षे काम होत नाहीत परंतु लोकप्रतिनिधी व शासनाकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांची कामे गुत्तेदाराकडुन बोगस रित्या सर्रासपणे सुरू आहेत यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी अभियंत्यांची मिलीभगत असल्याने कामे बोगस करण्याचा सपाटा सुरू केला असल्याचे वानखेडे यांनी सांगितले आहे.
हिमायतनगर शहरातुन जाणाऱ्या महामार्गावर सुरू असलेल्या नाली बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असुन राष्ट्रीय महामार्गाचा गुत्तेदाराचे लागेबांधे असल्याने काम बोगस करण्याचा सपाटा सुरू आहे. याकडे बांधकाम अभियंत्यांनी दुर्लक्ष करून स्वतचे उखळ पांढरे करीत असल्याचा आरोप माजी खा.सुभाष वानखेडे यांनी केला .या कामाची चौकशी करून नालीची लांबी रूंदी किती गज कोणता वापरल्या जातोय याची सखोल चौकशी करण्यात झाली पाहिजे आणि बोगस गुत्तेदारांवर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वानखेडे यांनी केली आहे.
आ.हेमंत पाटालांमुळे मिळाला निधी ? गुत्तेदारांकडून काम बोगस
तत्कालीन खासदार तथा विद्यमान आमदार हेमंत पाटील यांच्या पुढाकारातून हिमायतनगर वाढोणा येथील श्री परमेश्वर मंदिरास 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता. विकास कामाला सुरुवात झाल्याने मागील काळात हेमंत पाटील यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याची भावना मंदीर ट्रस्ट सह भाविकांतून व्यक्त केली . परंतु सदरील काम बोगस करून गुत्तेदारांनी निधी लाटला असल्याचा आरोप माजी खा सुभाष वानखेडे व ट्रस्टकडून होत आहे.
