हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी सज्जा मध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे तर नाल्या काठच्या शेतातील पिके उध्वस्त होऊन जमिनी खरडून गेल्या आहेत.या शेतकऱ्यांना शासनाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या होत्या.तहसिलदार यांच्यासह मंडळ अधिकारी, कृषी सहायक, ग्रामपंचायत अधिकारी यांच्या स्वाक्षरीने अहवाल शासनाकडे देण्याची जबाबदारी महसूल च्या तलाठी यांच्याकडे होती.परंतु बोरगडी सज्जाचे तलाठी यांनी बोरगडी,कारला,सिबदरा गावातील शेतकऱ्यांचे नुकसान क्षेत्र 55 ते 60 टक्के दाखवून असा अहवाल शासनाकडे सादर केला होता.
या बाबतीत तलाठ्यांना तहसीलदार,मंडळाधिकारी यांनी याद्या सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांचे क्षेत्र शंभर टक्के क्षेत्र दाखवून अहवाल सादर करा अशा सुचना केल्या होत्या.तरी देखील शेतकऱ्यांचे वैरी असणाऱ्या तलाठी यांनी शासनासह वरिष्ठांचा आदेश धूडकावून आपली मनमानी करीत शेतकऱ्यांचे नुकसान क्षेत्र कमी दाखवले आहे .
त्यामुळे या बोरगडी सज्जातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले.असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी सदरील तलाठ्यांच्या विरोधात उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर तहसीलदार यांनी नैसर्गिक आपत्ती काळात शेतकऱ्यांचे नुकसान केले असल्यामुळे शेतकऱ्यांत असंतोष निर्माण झाला असल्याने तलाठी केशव थळंगे यांच्याकडील पदभार काढून तहसीलदार यांनी आंदेगाव येथील महसूल अधिकारी संजय बिर्हाडे यांच्याकडे पदभार दिला आहे.तलाठ्यांनी मनमानी केल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याने तलाठ्यांना सज्जा सोडावा लागला असुन पुढील कार्यवाही काय होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.नैसर्गीक आपत्ती काळात शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून मनमानी करणाऱ्या तलाठ्यांना निलंबित करा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
