नांदेड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांचा आदर्श उपक्रम : एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून

नांदेड : जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि ओल्या दुष्काळामुळे शेतकरी व नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत एक महिन्याचा पगार (सप्टेंबर महिन्याचा अंदाजे एक लाख रुपये) पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे.

चिंचोलकर हे स्वतः शेतकरी कुटुंबातील असून यवतमाळ जिल्ह्यातील पुरग्रस्त गावाचे रहिवासी आहेत. त्यामुळे त्यांना पुरस्थितीचे वास्तव व वेदना जवळून ज्ञात आहेत. “नांदेड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी बांधवांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून माझा एक महिन्याचा पगार जिल्ह्यातील पुरग्रस्तांसाठी आर्थिक मदत म्हणून देत आहे,” असे त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.

हा निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन निधीत, एनजीओमार्फत किंवा पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून योग्य त्या ठिकाणी पोहोचवावा, अशी विनंती चिंचोलकर यांनी मा. पोलीस अधीक्षक यांना केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.