#नांदेड , दि. १६ डिसेंबर : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या संकल्पनेतून पावसाच्या पाण्याचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी नांदेड जिल्ह्यात सुमारे एक लाख जलतारे निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. या उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ जिल्ह्यातील विविध गावांमध्ये करण्यात आला असून “Catch the Rain – Where it Falls, When it Falls” या #जलसंधारण संकल्पनेला अधिक बळकटी देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पावसाचे अतिरिक्त पाणी शेतात मुरवून भूजलपातळी वाढवणे, जमिनीची धूप रोखणे, जमिनीची पोत सुधारणे, उत्पादनक्षमता वाढवणे व नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.
याच अनुषंगाने जलतारा चळवळीत सर्वाधिक व उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दर पंधरवड्याला शुक्रवारी “Coffee with Collector” या अभिनव उपक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांसोबत कॉफी घेत कामकाजाचा अनुभव, अडचणी, उपाययोजना व नाविन्यपूर्ण संकल्पनांवर सखोल चर्चा करण्यात आली.
ग्रामपंचायत विभाग
या विभागातून ग्रामरोजगार सेवक धोंडू पाटील व ग्रामपंचायत अधिकारी एस. यु. मोरे, (ग्रापं. लालवंडी, ता. नायगाव), लिपिक-सह-संगणक चालक ज्ञानेश्वर कयापाक, तांत्रिक सहाय्यक शिवहार कांबळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी उकंडराव पवार, कृषी अधिकारी शिवराम मुंडे, गटविकास अधिकारी ज्ञानेश्वर टाकरस (पंचायत समिती, किनवट) यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कृषी विभाग
कृषी विभागातून कृषी सहाय्यक श्रीमती यु. आर. कवटीकवार, मंडळ कृषी अधिकारी दशरथ शिंदे, सहाय्यक कृषी अधिकारी गोविंद बामनपल्लेह, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे यांचा उत्कृष्ट योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.
या उपक्रमांतर्गत अधिकारी, कर्मचारी व CSO प्रतिनिधींनी जलतारा कामे कशा पद्धतीने राबविली, काम करताना कोणत्या अडचणी आल्या व त्या कशा सोडविल्या, याबाबत अनुभव कथन करण्यात आले.
कार्यक्रमास पाणी फाऊंडेशनची टीम उपस्थित होती. पाणी फाऊंडेशनचे प्रविण काथवटे यांनी Farmer Cup संदर्भात माहिती देत सादरीकरण केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या डॉ. माधुरी रेवणवार यांनी शेतीतील लागवड खर्च कमी करून उत्पादन वाढवण्यासाठी शेतउपयोगी तंत्रज्ञानाचा वापर व कृषी विज्ञान केंद्रातील प्रात्यक्षिक भेटींबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी संजीव मोरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नायब तहसीलदार जयशंकर इटकापल्ले, तालुका कृषी अधिकारी प्रशांत कासराळे, नोडल अधिकारी चेतन जाधव, MIS समन्वयक रूपेश झंवर, प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, Coffee with Collector उपक्रमासाठी आमंत्रित अधिकारी-कर्मचारी व CSO प्रतिनिधी, पाणी फाऊंडेशन टीम तसेच संपूर्ण जिल्हा नरेगा टीम मोठ्या संख्येने उपस्थित होती.
