जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा

नांदेड, दि.30 नोव्हेंबर : जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली पशुसंवर्धन विभागाच्या विविध योजनांचा आढावा नुकताच घेण्यात आला. या बैठकीत सर्व सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, पशुधन विकास अधिकारी, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक तसेच ‘मैत्री’ आणि ‘नॅशनल डेअरी स्कीम’ अंतर्गत कार्यरत सेवादाते उपस्थित होते.

बैठकीत नांदेड जिल्ह्यातील पशुप्रजनन कार्य, दुग्ध उत्पादन वाढीसाठी विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प (टप्पा 2) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या बाबी तसेच किसान क्रेडिट कार्ड, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन कायदा इत्यादी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

प्रजननक्षम गाय व म्हैसवर्गीय जनावरांच्या वंध्यत्व निवारण शिबिरांचे आयोजन करून कृत्रिम रेतनाची टक्केवारी वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. कर्डिले यांनी दिल्या. जास्त दूध उत्पादन देणाऱ्या जनावरांची निर्मिती करण्यासाठी लिंगवर्गीकृत रेत मात्राचा प्रभावी वापर करण्यावर भर देण्यात आला. दुग्ध उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रकल्पाचा कृती आराखडा तयार करून काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच पशुधनातील लसीकरणाची स्थितीचाही यावेळी आढावा घेण्यात आला.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवर आधारित अर्थव्यवस्था दोलायमान झाल्यामुळे पशुसंवर्धन व्यवसाय हाच शाश्वत आर्थिक लाभ देऊ शकतो, असे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. पुढील काळात स्वतः आणि अधिनस्त सर्व यंत्रणा पशुसंवर्धन क्षेत्राला प्राधान्य देऊन शेतकरी व पशुपालकांना आवश्यक सहकार्य करतील, असे त्यांनी सांगितले. दरमहा पशुसंवर्धन विभागाचा नियमित आढावा घेण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.

नांदेड जिल्ह्यातील कृत्रिम रेतनाचे कार्य दुप्पट करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नियंत्रित प्रजनन कार्यक्रमाची प्रगती पाहून “एक गाव – एक फार्म” या संकल्पनेवर आधारित प्रकल्प राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. यावेळी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) 2025–2026 अंतर्गत चारा उत्पादन योजनेतून मका, ज्वारी व बाजरी बियाण्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात वितरण जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.

बैठकीस जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. राजकुमार पाडिले, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार घुले, डॉ. विजय काटकाडे, डॉ. अरविंद गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी श्री. सोनकांबळे, जिल्हा उद्योग केंद्राचे श्री. प्रविण चव्हाण, जिल्हा दुग्ध व्यवसाय अधिकारी श्री. अनिल चव्हाण, नॅशनल डेअरी स्कीमचे प्रकल्प समन्वयक डॉ. ज्ञानेश्वर सोनटक्के, विदर्भ–मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाचे जिल्हा प्रकल्प अधिकारी डॉ. सतीश खिल्लारे तसेच सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
0000

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.