डिजेमुक्त पर्यावरणपूरक #उत्सव साजरे करून नांदेडची नवी ओळख निर्माण करू या : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

डिजेमुक्त #गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाचा सन्मानपत्र देऊन गौरव  
नांदेड , दि. 2 सप्टेंबर :- जिल्ह्यात श्री गणेशोत्सव उत्सवात शांततेने आनंदाने साजरा करतांना तो पर्यावरणपूरक डिजेमुक्त म्हणून आपण साजरा करत आहोत. या उपक्रमातून नांदेड जिल्ह्याची चांगली नवी ओळख निर्माण करू या, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले.     

जिल्ह्यात श्री गणेशोत्सव डीजे मुक्त साजरा करण्याच्या अनुषंगाने विविध गणेश मंडळाचा #सत्कार सोहळा जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे आज आयोजित करण्यात आला होता. यावेळी जिल्ह्यातील जवळपास 250 गणेश मंडळांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक यांच्यासह विविध गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक आदींची उपस्थिती होती. 

सण उत्सव आनंदाने साजरा करतांना डिजे वाजवल्याने त्याचे दुष्परिणाम सर्वांनाच सहन करावे लागतात. या आवाजामुळे हृदयावर वाईट परिणाम होतात. हे लक्षात घेऊन जिल्ह्यातील 250 गणेश मंडळांनी स्वत: पुढे येऊन डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे हमीपत्र दिले आहे. ही बाब कौतूकास्पद असून प्रत्येक सण उत्सवासाठी हा नवा आदर्श राहील, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने चांगली शिस्त लावली आहे. समाजात नागरिकांनी स्वत: स्वयंशिस्तीने पुढे आल्यास सर्वांचे जीवन चांगले सोपे होईल. प्रत्येक ठिकाणी कायदाचा वापर न करता सहकार्यातून अनेक चांगल्या गोष्टी उपक्रम आपण राबवू शकतो. हे यातून दिसून येते. गणेश मंडळांना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी जिल्हा प्रशासन तत्पर असल्याचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी यावेळी सांगितले.       

न्यायालयाच्या सुचनेनुसार आपण डिजे मुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचे चांगले नियोजन केले आहे. त्याबद्दल सर्व गणेश मंडळाचे पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार यांनी आभार व्यक्त करून अभिनंदन केले. नांदेड जिल्ह्यात उत्सव काळात शांतता राखून उत्तम नियोजन राखले जाते. जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासनाच्या नियोजनात आपला सहभाग असल्याने आम्हाला चांगले नियोजन करता येते. उत्सव सण काळात डिजेचा वापर न करता पर्यावरणपूरक उत्सव साजरे करुन चांगला आदर्श निर्माण करू शकतो. उत्सव काळात गणेश मंडळांना दिलेल्या सुचनेचे योग्य पालन करा. विसर्जन काळात रस्ता मार्गात बदल करू नका. वेळेचे बंधन पाळा. सर्व धर्मांचा आदर करून सण, उत्सव शांततापूर्वक आपण साजरे करु या, असे आवाहन पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार केले.   

प्रस्ताविकात अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुरज गुरव यांनी उत्सव काळाता शांतता आबाधित राखण्यासाठी समाजाचा खूप मोठा हातभार असतो. डिजेमुक्त गणेशोत्सव साजरा करणाऱ्या गणेश मंडळाचा पोलीस दलामार्फत स्वागत करण्यात आले आहे. जे डिजे वाजवतील त्यांच्यावर पोलीस दलामार्फत कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.