हिमायतनगर प्रतिनिधी /-अमृत भारत योजने अंतर्गत तब्बल ४२ कोटी रुपयांच्या निधीतून हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे नूतनीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. मात्र या कामाचा वेग अत्यंत संथ असून, ठेकेदाराने सुरू केलेले काम निकृष्ट दर्जाचे व थातूरमातूर होत असल्याचे चित्र समोर आले आहे. परिणामी प्रवासी वर्गाला पावसामध्ये मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
कामातील अनियमितता यामुळे प्रवाशांचे बेहाल होतं असून, हिमायतनगर स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर शेडचे काम लॉकडाऊनपासून सुरू असून, आजतागायत पूर्ण झालेले नाही. सिमेंट काँक्रीटचे काम निकृष्ट दर्जाचे, तर वापरण्यात आलेले स्टील कमी जाडीचे असल्याची तक्रार नागरिकांतुन केली जात आहे. काम सुरू असताना ठेकेदाराने सूचनाफलक वा बॅरिकेट लावले नसल्याने अनेक प्रवासी अडखळून पडले, काही जण लोखंडाला धडकून जखमी झाले आहेत. स्टेशनच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरच्या पर्यायी रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, अनेक नागरिक घसरून जखमी होत आहेत. प्लॅटफॉर्मवर रात्री वीजपुरवठा पुरेसा नाही; केवळ काही मिनिटे दिवे चालू ठेवले जात असल्याने अंधारात प्रवाशांना त्रास व चोरीच्या घटनाचा सामना करावा लागतो आहे. तसेच सार्वजनिक शौचालयाची सुविधा नाही, पार्सल सेवा बंद असल्याने प्रवाशांना व्यापाऱ्यांना मोठी गैरसोय होत आहे.
एकूणच रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या कामाबाबत प्रवाशांचा संताप अनावर होतं असून, प्रवाशांनी थेट आरोप केला आहे की, जुन्या इमारतीला जसेच्या तसे ठेवून आजूबाजूने नवीन भिंती उभ्या करून नूतनीकरणाचे काम खोटे दाखवले जात आहे. मागील तीन वर्षांपूर्वीच कोट्यवधी खर्चून तयार केलेले प्लॅटफॉर्म तोडून पुन्हा त्याच्यावर थातूरमातूर काम करून ‘मलिदा लाटण्याचा’ प्रयत्न होत आहे. त्यामुळे नागरिक व प्रवाशांच्या सुरक्षेला तडा जात असूनही ठेकेदार व रेल्वे प्रशासन निष्क्रिय बनले असल्याचे बोलले जात आहे.
ठेकेदाराकडून अंदाजपत्रकाप्रमाणे काम करून घेऊन नूतनीकरण तातडीने पूर्ण करावे. प्लॅटफॉर्मवर सूचना फलक व बॅरिकेट बसवावेत, वीजपुरवठा कायम ठेवावा. पोलीस चौकी, सार्वजनिक शौचालय, पार्सल सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. काझीपेठ–मुंबई गाडी पुन्हा सुरू करावी व हिमायतनगर स्थानकावर धनबाद एक्सप्रेसला थांबा द्यावा. नांदेडचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी अचानक हिमायतनगर स्थानकाला भेट देऊन सुरू असलेल्या कामाची तपासणी करून ठेकेदाराच्या कामकाजावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी व शहरवासीय नागरिकांतून जोर धरत आहे.
