पवित्र अयोध्या नगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या प्रभु राम मंदिर स्थापनेच्या मुहुर्तावर श्री परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे भव्य संगीतमय रामकथा सोहळा होणार असून भाविकांनी या भक्तीमय सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
हिमायतनगर शहरातील परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने पवित्र अयोध्या नगरीतील नव्याने बांधण्यात आलेल्या मंदिरात दि. 22 जानेवारी रोजी प्रभू श्रीरामाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना होणार असून त्या निमित्ताने परमेश्वर मंदिर (वाढोणा) येथे भव्य संगीतमय रामकथेचे आयोजन दि. 16 जानेवारी पासून सुरूवात होणार असून 22 जानेवारी पर्यंत दररोज दुपारी 1 ते 4 या वेळेत होणार आहे. भव्य संगीतमय रामकथा ह. भ. प. आचार्य बालयोगी स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांच्या सुमधुर वाणीतून होणार आहे. तसेच अयोध्या येथील प्रभु श्री रामाच्या मुर्ती प्रतिष्ठापनेचे थेट प्रक्षेपण सकाळी 11 :30 पासून परमेश्वर मंदिर येथे दाखविण्यात येणार आहे. मंदिरात भव्य विद्युत रोषणाई व पाच हजार दिवे लावण्यात येणार आहेत. त्यानंतर या रामकथेची सांगता आणि महाप्रसाद वाटप करण्यात येणार आहे. या भक्तीमय सोहळ्याचा तालुक्यातील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन परमेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.
