कामारी गावातील मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू केले होते. रविवारी दिवसभर सुदर्शन ज्ञानेश्वर देवराये हा तरुण उपोषणात सहभागी होता. सायंकाळी शेताकडे जाऊन येणार असल्याचे सांगून गेला परंतु सायंकाळी उशिरापर्यंत घरी परतला नसल्यामुळे घरच्यांनी शेताकडे जाऊन बघीतले असता सुदर्शन देवराये यांनी शेतात गळफास घेतल्याची घटना घडल्यामुळे गावकरी घटनास्थळी जमा झाले होते.
मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने चिंतेत असलेल्या सुदर्शन देवराये या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना कामारी गावात घडली आहे. शासनाच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याची त्याने लिहून ठेवलेली चिट्टी आढळून आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मराठा समाज आक्रमक झाला होता. सकाळी 8 वाजेपासून हिमायतनगर शहरातील मुख्य रस्त्यावर टायर जाळून निषेध केला. घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने हिमायतनगर शहर बंद करण्यात आले होते. या बंदला स्थानिक व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत बाजारपेठ बंद ठेवले आहे. पोलीस ठाण्याच्या समोर सकल मराठा समाजाचा जमाव झाला होता.त्यामुळे शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.
या घटनेनंतर कामारी गावासह तालुक्यातील मराठा समाज एकत्रित होता. पोलीस ठाण्यात जवळपास पाच तास मराठा समाज बांधवांनी ठिय्या आंदोलन केले. घडलेल्या घटनेला सरकार जबाबदार असल्याच्या घोषणा केल्या असून मयताच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची मदतीची मागणी केली.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी शासनाकडून मयताच्या पत्नीस शासकीय सेवेत नौकरी, कुटुंबियांना पाच लाखाची मदत, घरकुल मंजुरी,मुला ,मुलीचे शिक्षणाची जबाबदारी शासन घेणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे, आ. माधवराव पाटील जवळगावकर,माजी आ. नागेश पाटील,बाबुराव कोहळीकर ,अप्पर पोलीस अधीक्षक खंडेराव धरणे, उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, तहसीलदार आदित्य सेंडे, पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनुर,अरूणा संगेवार ,संभाजी बिग्रेड प्रदेशाध्यक्ष माधव देवसरकर,यांनी पोलीस ठाण्यात उपस्थित राहून मराठा बांधवांना शांतता ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर मयताचे श्वेछदन करून प्रेत कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले.
मयत सुदर्शन देवराये यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा , एक मुलगी असा परिवार आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आपले जिवन संपविणाऱ्या सुदर्शन देवराये यांच्या कुटुंबियांनी प्रेत पाहताच हंबरडा फोडला असुन ऐन तारुण्यात समाजासाठी आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याने कुटुंबिय उघड्यावर आले आहे. कामारी गावात सायंकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक बि डी भुसनुर यांनी दिवसभर आंदोलकांना अतिशय शांततेत घेऊन शहरात गालबोट लागणार नाही यासाठी पोलीस बंदोबस्त वाढवला होता.
अशोकराव चव्हाण यांची प्रतिक्रिया...
कामारी, ता. हिमायतनगर, जि. नांदेड येथील सुदर्शन देवराये नामक युवकाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. देवराये कुटुंबाच्या दुःखात मी सहभागी आहे. शासनाने या घटनेची तातडीने दखल घ्यावी.
मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे. त्यासाठी राजकीय व कायदेशीर पातळीवर लढा द्यावा लागणार आहे. मात्र, समाजातील सर्व तरूणांना माझी कळकळीची विनंती आहे की, कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका. हा प्रश्न आयुष्य संपवून नव्हे तर शासनावर लोकमताचा दबाव निर्माण करूनच सुटणार आहे.
कांग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
आ. माधवराव पाटील जवळगावकर यांची प्रतिक्रिया
कामारी गावातील तरुण सुदर्शन देवराये यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केली. अंत्यत दुर्दैवी घटना आहे. मी उपोषण स्थळी रविवारी भेट दिली असता सुदर्शन देवराये उपोषण स्थळी होता. त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय धक्कादायक आहे. देवराये कुटुंबियांच्या दुखा: मी सहभागी असुन त्या कुटुंबियांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
