हिमायतनगर प्रतिनिधी/ हदगाव हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे ओला दुष्काळ परिस्थिती असुन शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शेतीचे सरसकट पंचनामे करून मदत देण्याची मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी जिल्हाधिकारी डॉ अभिजीत राऊत यांच्याकडे केली आहे.
हिमायतनगर हदगाव तालुक्यात एकाच आठवड्यात सलग दोन वेळा अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस, सोयाबीन, उडीद, मुग यासह शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नदीकाठासह नाल्या काठची शेती बांध फुटून दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेती पिकासह घरांची पडझड झाली आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे शेतीत पाणी साचून तलावा सारखी परिस्थिती निर्माण होऊन सर्व पिके पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे
.त्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. हदगाव हिमायतनगर तालुक्यातील सलग सात दिवस अतिवृष्टी होऊन नुकसान झाल्यामुळे दोन्ही तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवाच्या शेतीचे सरसकट पंचनामे करुन सरसकट अनुदान देण्यात यावे अशी मागणी आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शनिवारी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे.
