हिमायतनगर :- ( वार्ताहर ) तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही संततधार पाऊस कोसळत असून नदी, नाले, ओढे ओव्हर फ्लो झाले असून नदी, ओढ्या काठावरील पिके वाहून गेली आहेत. तर या वर्षी ही वडगाव ज. गावाचा तालूक्याशी असणारा संपर्क तुटला आहे. खरिपाच्या पेरणीतील पिके अगदी कोवळी असल्याने पाणी साचून पिके नासून जात आहेत. परिणामी खरिपाची पेरणी धोक्यात आली आहे.
तालुक्यात गेल्या आठवडाभरापासून पावसाला सुरूवात झाली. हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. परंतू गेल्या दोन चार दिवसा पासून पावसाने आक्रमक पवित्रा घेतला असून जोरदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून काहीं वेळाचा खंड सोडला तर, या भागात संततधार पाऊस बरसत आहे. नदी नाले ओव्हर फ्लो झाले असून पावसाच्या पाण्याचा जोर अधिकच वाढत असल्याने नदी नाले आजूबाजूचा परिसर कवेत घेवून वाहत असल्याने पिके मोठ्याप्रमाणात बाधीत झाली आहेत. हिमायतनगर मंडळात ९२, तर सरसम मंडळात ९५, आणी जवळगाव ७५ मी. मी पावसाची नोंद झाली असून एकूण २५२ मी. मी. पाऊस कोसळला असल्याची माहीती तहसील प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कोवळ्या पिकांवर अतिपावसाचा घाला झाल्याने पिकांची अवस्था अतिशय नाजूक बनली आहे. हिमायतनगर, पळसपूर दरम्यान ठेकेदाराने काम अर्धवट ठेवले असल्याने नाल्याला पुर येवून पळसपूर गावाचा तालूक्याशी असणारा संपर्क तुटला आहे. व तसेच वडगाव ज. या गावाशेजारील नाल्याला पुर आला असल्याने वडगाव गावाचा ही संपर्क शहराशी तुटलेला आहे. किरमगाव गावाशेजारील नाल्यावरील मिनी पुल पुराच्या पाण्याच्या प्रवाहाने तुटला असून किरमगाव, टेंभुर्णी गावाचा संपर्क तुटला आहे. तर डोल्हारी, गांजेगाव दरम्यान पैनगंगा दुथडी भरून वाहत असल्याने मराठवाडा, विदर्भ जोडणारा रस्ता बंदच असून विदर्भ, मराठवाड्याचाही संपर्क तुटला आहे. वडगाव ज. येथील नाल्यावरील पुलाची उंची कमी असल्याने वरील भागात पाऊस कोसळला की, मोठा पुर येत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून येथील नागरिकांची समस्या जैसे थे आहे. पुराच्या पाण्यात जाणे, येणे शक्य नसल्याने गावकरी सातत्याने पुलाची उंची वाढवण्याची मागणी करतात. परंतू राजकीय मंडळी वेळ मारून नेतात. समस्या जैसे थे आहे. तालुक्यात होत असलेल्या अतिपावसाने खरिपाची पेरणी धोक्यात आली असून आणखीण काही दिवस असाच पाऊस कोसळत राहीला, तर खरिपाची पेरणी पूर्णता संकटात येण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त केली जात आहे. दरम्यान तालूका दंडाधिकारी अदिनाथ शेंडे यांनी पूरग्रस्त भागात भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली असून शेत पिकांचे नुकसान झाले आहे. परंतू कुठेही जिवित हानी झाली नाही. असे तहसीलदार अदिनाथ शेंडे यांनी सांगीतले.
