हिमायतनगर प्रतिनिधी/ सध्या आपल्या देशात उद्योग-व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतोय. तरुण याकडे करिअर म्हणून बघू लागले आहेत. अजुन खूप मोठा बदल घडणं अपेक्षित असला तरी हा बदलही खूप आश्वासक आणि नवी दिशा देणारा ठरणार आहे. इतरांपेक्षा आपण व्यवसायात वेगळं नवीन काय करू शकतो याचा विचार करा. टेक्नॉलॉजीचा वापर करा, त्याशिवाय तरणोपाय नाही. व्यवसाय कायम स्वच्छपणे करा, ग्राहकांना आणि स्व:तला फसवू नका हाच यशाचा मंत्र असल्याचे प्रभारी गटविकास अधिकारी उमेश मुदखेडे यांनी व्यक्त केले आहे.
हिमायतनगर पंचायत समिती कार्यालयाच्या आढावा बैठकीत ग्रामीण भागातील कारला येथील तरुण नागनाथ कोंडेवाड हे दररोज शहरासह विविध कार्यालयात हरभरे, मुरमुरे विक्री करून आपल्या संसाराचा गाडा हाकतात त्या तरुणाने चक्क पंचायत समिती बैठकीत अधिकाऱ्यांना भेटून आपल्या व्यवसायाची हकीकत सांगितली असता पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी मुदखेडे यांनी त्या तरुणाचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी ते बोलतांना म्हणाले की लोकांच्या आवडी-निवडी खूप झपाट्याने बदलतात. मार्केटही त्याच वेगाने बदलत असतं. चाणाक्ष व्यावसायिकही त्याच प्रमाणात बदलतो आणि व्यवसायात टिकून राहतो. काळ जसा बदलतो त्याच प्रमाणात संधीही बदलत असतात. त्या शोधता आल्या पाहिजेत. हे ज्याला जमतं तो यशस्वी होतो. ग्रामीण भागातील तरुणांनी उद्योगाकडे वळले पाहिजे असेही मुदखेडे म्हणाले यावेळी प. स. चे विस्तार अधिकारी धर्मेकर,वरिष्ठ सहायक दमकोंडवार, ग्रामसेवक नारायण काळे ,शैलेंद्र वडजकर,पुपलवाड ,सिलेवाड गजानन शिंदे, चव्हाण, पवार,स्वप्निल भद्रे,सुर्यवंशी, यांच्यासह ग्रामसेवक अधिकारी उपस्थित होते
