पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडावे - खा. हेमंतभाऊ पाटील

हिमायतनगर - 
पैनगंगा नदीला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून डाव्या आणी उजव्या कालव्या प्रमाणे पाणी सोडण्यात येवून या भागातील शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अशी मागणी हिंगोली लोक सभा मतदार संघाचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केली आहे. 

राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन दिलेल्या निवेदनात खासदार हेमंतभाऊ पाटिल यांनी म्हटले आहे की, इसापूर धरण होण्या अगोदर पैनगंगा नदी ही बारमाही वाहत होती. धरण झाल्यानंतर पैनगंगा फक्त, पावसाळा, हिवाळा या दोनच ऋतूत वाहत असून उन्हाळ्यात नदी कोरडी ठाक पडत आहे. परिणामी नदी काठावरील नागरीकांना उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई चा सामना करावा लागतो आहे. दुसरी बाब अशी की, पावसाळ्यात इसापूर प्रकल्प भरला की, पैनगंगेत अतिरिक्त पाण्याचा विसर्ग केला जातो. पुराच्या पाण्याने हजारो हेक्टर जमिनीवरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. डाव्या आणी उजव्या कालव्यात पाणी सोडल्या जाते, मराठवाडा, विदर्भ अश्या दोन्ही भागातील शेतकऱ्यांना या पाण्याचा लाभ मिळतो, परंतू पावसाळ्यात ज्यांचे खरे नुकसान होत आहे. अश्या पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळत नाही. हे या भागातील शेतकऱ्यांवर एक प्रकारे अन्यायच होत आहे. त्यामुळे पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडण्यात यावे, जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध होवून शेतकरी समृद्ध होतील.  

या बाबीकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून पैनगंगेला तिसरा कालवा घोषित करून इसापूर प्रकल्पांतून पाणी सोडण्यात यावे. अशी मागणी खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केली असून खासदार पाटील यांच्या प्रयत्नाना सुयश आले आहे. लवकरच एक विशेष बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढण्यात येईल. असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी खासदार पाटील यांना दिले असल्याने या भागातील शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

यावेळी हदगाव, हिमायतनगर विधान सभेचे लोकनेते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांची प्रामूख्याने उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.