हिमायतनगर प्रतिनिधी/ किनवट तालुक्यातील जलधरा आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणातून विष बाधा झाल्यामुळे सदरील 11 विद्यार्थ्यांना हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.येथील वैधकीय अधिकाऱ्यांनी तात्काळ उपचार सुरू केले होते.
जलधरा आश्रम शाळेतील 11 विद्यार्थ्यांना जेवणातील भाजी मधुन विष बाधा झाली असल्याची घटना दि. 20 सप्टेंबर रोजी घडली आहे. आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवणात विष बाधा झाल्याने विद्यार्थ्यांना अचानक पोटाचा त्रास होत होता त्यामुळे शिक्षकांनी तात्काळ हिमायतनगर ग्रामीण रूग्णालयात उपचारांसाठी दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. डि.डि.गायकवाड,डॉ.भुरके यांनी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले. 11 पैकी 5 विद्यार्थ्यांना नांदेड रूग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले असून 6 विद्यार्थ्यांवर हिमायतनगर ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. डी. गायकवाड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की विष बाधा झालेल्या सर्व विद्यार्थ्यांवर आम्ही उपचार केले असून सहा विद्यार्थ्यांची तब्येत सुधारली आहे. सदरील प्रकार लक्षात घेऊन जलधरा आश्रम शाळेवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य मिशनचे एक पथक तात्काळ दोन वैद्यकीय अधिकारी, महिला डॉक्टर सह औषधी घेऊन जायमोक्यावर पाठवण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. डि. डि. गायकवाड यांनी बोलताना सांगितली आहे.
