हिमायतनगर प्रतिनिधी/ अतिवृष्टीमुळे प्रत्येक गावात गोरगरीब नागरीकांच्या घरांच्या भिंती ढासळून कच्च्या मातीचे घरे पडली आहेत त्या नागरीकांच्या घरोघरी जाऊन ग्रामसेवकांनी सर्वे करावा कोणताही नागरीक वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी केले आहे.
हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. याबरोबरच प्रत्येक गावातील नागरीकांच्या घरांच्या भिंती देखील ढासळून कुटुबिंय उघड्यावर आले आहेत. पंचायत समितीच्या सभागृहात गटविकास अधिकारी यांनी अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांच्या सर्वेक्षण संदर्भात तालुक्यातील ग्रामसेवकांची बैठक बोलावली होती.
बैठकी दरम्यान प्रत्येक गावातील पडझड झालेल्या घरांचे सर्वे करण्याचे ग्रामसेवकांना सुचविले आहे.
गटविकास अधिकारी यांच्या आदेशानंतर गावोगावच्या सरपंच ग्रामसेवक, सदस्यांनी गावात पडझड झालेल्या घरांचा सर्वेक्षण सुरू केले आहे. अतिवृष्टीमुळे पडझड झालेल्या घरांचा सर्वे करतांना एकही नागरीक वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी मयूर आंदेलवाड यांनी केले आहे. कारला येथील ग्रामसेवक नारायण काळे,सरपंच गजानन कदम, उपसरपंच रोशन धनवे ,प्रा.डी.डी.घोडगे सदस्य सोपान बोंपीलवार, रामेश्वर यमजलवाड, गजानन मिराशे, डॉ गफार, यांनी गावातील नागरीकांच्या घरांचे सर्वेक्षण केले असून लवकरच प्रस्ताव सादर करणार असल्याचे ग्रामसेवक काळे यांनी सांगितले.
