डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे कृतार्थ स्मरण करताना

। *दत्तात्रय अन्नमवाड* 
कोट्यवधी वंचित, शोषित वर्गाच्या जीवनात आनंद पसरवणाऱ्या,स्वातंत्र्य समता व बंधुता यावर आधारित समाज व्यवस्था निर्मितीसाठी आयुष्य वेचणाऱ्या महामानवांचे स्मरण करून वंदन करण्याचा आजचा दिवस.कोणत्याही थोर पुरुषांचे आचार-विचार कृतीत उतरवण्यासाठी जयंती पुण्यतिथीचीच वाट पाहायची गरज नसावी.त्यांचे अपूर्ण कार्य पुढे नेण्यासाठी एकत्र येऊन सामाजिक प्रश्न व समस्या यावर चर्चा घडवणे ही त्यांच्या अनुयायांची जबाबदारी असते. समाजांची दिशा,ध्येय धोरण ठरवून तो कार्यक्रम यानिमित्ताने पुढे नेता यावा...
 अलीकडील काळात पुण्यतिथी म्हणजे उत्सवाचे स्वरूप आलेले दिसते.ज्यांनी संपूर्ण आयुष्य तळागाळातील सामान्यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत याची जाणीव आपल्याला असणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ यंत्र साधनांनी धांगडधिंगा घालून उत्सवी रुपात साजरा करणे म्हणजे जयंती नाही. वैचारिक जयंती साजरी करायला हवी.डॉ.बा.आंबेडकर यांच्या विचारांचे पालन करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न देखील व्हायला हवा.मूलभूत हक्क व अधिकारापासून वंचित ठेऊन हक्क आणि अधिकारांची संधी नाकारली गेली.सामाजिक आर्थिक मानसिक दृष्ट्या बहुतांशी जाती जमाती दीनदुबळ्या झाल्या होत्या.. सर्वांच्या कल्याणाचा विचार करून संविधानात नैतिक मूल्यांची शिकवण दिलेली आहे. लोकशाहीने भारताला खूप मोठे हक्क मिळवून दिले.देशाचा राज्यकारभार कोणी व कसा करावा...?हे या देशातील सार्वभौम जनतेने ठरवावे.याचे नियम घालून दिले.सत्तेतील लोक नियमानुसार वागले नाहीत तर त्यांना पायउतार करण्याचा अधिकार घटनेने सामान्य माणसाच्या हातात दिलेला आहे. संविधानातील सर्वांच्या कल्याणाच्या तरतुदीमुळे सामान्याचे जीवन उजळले आहे. या देशातील वंचित,शोषित वर्ग काही प्रमाणात प्रगती करू लागला आहे.भारताला अखंड सार्वभौम प्रजासत्ताक लोकशाही राष्ट्र अशी ओळख मिळवून देऊन विषमतेची ज्वाला शांत करणार्‍या दया सागराने क्रांतीची मशाल हातात घेऊन मानवी जीवनाला धन्य केले.जातीभेद,वर्णव्यवस्था भेदामुळे शाळेच्या बाहेर बसणार्‍या महामानवाने देशाची राज्यघटना लिहिली किती मोठे हे आश्चर्य आहे...!
 भारतीय घटनेतील विविध कलमे,तरतुदी,जातिभेद,उच्च-नीच भेदभाव नष्ट करून,सर्व धर्म समभाव निर्माण करून समाज व्यवस्था बळकट आणि सक्षम बनवण्याचे अद्वितीय कार्य ही संविधानाची अनुपम अनमोल देण आहे.भारतातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने समान न्याय व हक्क मिळावा यासाठी त्यांनी घटनेत विविध कलमांचा समावेश केला.आज महिला अनेक क्षेत्रात मुक्तसंचार करत पुरुषाच्या बरोबरीने सन्मानाने प्रतिनिधित्व करत आहेत. डॉ.बा.आंबेडकर यांचे आधुनिक भारताच्या उभारणीत ऐतिहासिक आणि दूरगामी परिणाम करणारे योगदान आहे.आधुनिक भारताच्या यशस्वी वाटचालीसाठी एक दीपस्तंभ,मार्गदर्शक ठरलेल्या राज्यघटना निर्मिती पुरते मर्यादित नाही.त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा कर्तृत्वाचा आवाका फार व्यापक आणि विविधांगी आहे.डॉ.बा.आंबेडकर यांचे कर्तुत्व आणि व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत.संघर्षशील समाज क्रांतिकारक,विचारवंत,व्यासंगी अभ्यासक,विधी विशारद,समाजशास्त्रज्ञ,अर्थतज्ज्ञ,पत्रकार,संपादक,इतिहासकार,मानववंशशास्त्रज्ञ,जलतज्ञ,अशा अनेक अंगानी त्यांचे योगदान या देशाला दिले आहेत.भारतीय घटनेत आजपर्यंत अनेक दुरुस्त्या करण्यात आल्या,काही सुधारणा करून नवीन तरतुदी,कलमांचा अंतर्भाव करण्यात आला. देशातील कोणत्याही समस्यांचे उत्तर संविधानातून मिळते.एवढी मजबूत तत्वे व तरतुदी यामध्ये पारदर्शकपणे अंतर्भूत केलेली आहेत.
 केवळ मूठभर उच्चवर्णीय वर्गाच्या हिताचा विचार न करता संपूर्ण देशातील प्रत्येकाला घटनेने स्वातंत्र्य,समता,बंधुतेचि हमी दिली.लोकशाही व्यवस्थेच्या रक्षणा सोबतच आपल्या देशाने विविध क्षेत्रात केलेल्या प्रगतीचे कारण राज्यघटना आहे.घटनेतील तरतुदीमधून देशातील वंचित,उपेक्षित,शोषित पीडित समाजाच्या सामाजिक आर्थिक,सांस्कृतिक,विकासाचा मार्ग त्यांनी खुला केला. संविधानाच्या माध्यमातून अस्पृश्य,दलित,मागासवर्गीय,वंचित समाजासाठी दिलेल्या संधीची समानता अत्यंत महत्त्वाची तरतूद आहे.हजारो वर्षापासून वंचित,उपेक्षित असलेल्या वर्गाला समान पातळीवर आणण्यासाठी डॉ.बा.आंबेडकर यांनी दूरदृष्टीने मोलाचे प्रयत्न केले.बहुजन वर्गाचे सामाजिक,आर्थिक,सांस्कृतिक शैक्षणिक,राजकीय या सर्वच क्षेत्रात मागासलेपण होते,त्यांना आरक्षणाच्या माध्यमातून प्रवाहात येण्याची संधी मिळवून दिली. समाजात जोपर्यंत जातिभेद,उच्च-नीच,भेदभाव धार्मिक विषमता आहे तोपर्यंत देश कधीही प्रगती करू शकत नाही.समाजातील सर्व घटक वर्ग यांच्यातील भेदभाव,विषमता नाहीशी होऊन सर्व धर्म समभाव निर्माण होईपर्यंत आरक्षण ठेवणे योग्य आहे.डॉ.बा.आंबेडकर हे 20 व्या शतकातील भारतातील सामाजिक परिवर्तनाच्या क्रांतीचे मुख्य प्रणेते आहेत.हजारो वर्ष पददलित समाजाला धर्माच्या नावाने दाबून टाकण्यात आले. अशा वंचित,अस्पृश्य,दलित वर्गाला डॉ.आंबेडकर यांनी हक्कव अधिकाराची जाणीव करून दिली. त्यांना संघर्ष करण्यास प्रेरित केले.त्यांच्यातला स्वाभिमान,आत्मभान,जागा केला. ते केवळ एक क्रांतिकारक,राजकीय धुरंदर नेता नव्हते,तर एक गंभीर अभ्यासक,विचारवंत,समाजशास्त्रज्ञ होते.खऱ्या अर्थाने महामानव,विश्वरत्न होते.महामानव आपल्या विचारांनी,कर्तृत्वाणीं समाजात नव्या विचारांची बीजे पेरतात.दलित मागास वर्गातील न्यूनगंडाची भावना सोडून नव्या भवितव्याची स्वप्ने बाबासाहेबांनी पेरली.त्यांच्यातील अस्मिता जागी केली.परिवर्तनासाठी अस्मिता,स्वाभिमान जागृत ठेऊन कार्यरत राहावे लागते.भौतिक आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. दीनदलितांना त्यांचे राजकीय हक्क मिळवून देताना दुसऱ्या बाजूला त्यांची धार्मिक गुलामगिरीतून मुक्ततादेखील करायची होती. डॉ.बा.आंबेडकर यांनी या देशासाठी काय केले...? याचा विचार केल्यास गेल्या 72 वर्षाच्या इतिहासाची उजळणी करावी लागेल.ज्या वर्गाला गावकुसाबाहेर,वेशीबाहेर,दारिद्र्,गरिबी,अज्ञान,अंधकारात खितपत पडत जगायचे होते, कोणतेही हक्क-अधिकार नाकारलेली व्यवस्था समाजात चालू होती.अशावेळी झोपलेल्या समाजाला जागे केले.शिका,संघटित व्हा आणि संघर्ष करा....
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो पितो गुरगुरल्याशिवाय राहत नाही...
 हा संदेश त्यांनी बहुजन समाजाला दिला.या समाजाने बऱ्याच प्रमाणात हा संदेश स्वीकारला.आज अनेक वंचित,शोषित,आपले अस्तित्व निर्माण केलेले आहेत.शिक्षण हे सामाजिक आर्थिक प्रगतीचे लक्षण आहे.1950 पासून अनुसूचित जाती/जमाती या प्रवर्गाची साक्षरता,आर्थिक स्थिती,जीवनमान,केवळ आरक्षणाच्या तरतुदीमुळे बऱ्याच प्रमाणात सुधारलेले आहे.प्रवर्गातील काही लोकांची प्रगती झाली.मात्र बहुतांश समाजवर्ग अजूनही उपेक्षितच आहे.त्यांचा विचार होऊन त्यांना सामाजिक प्रवाहात आणणे ही काळाची गरज आहे. आरक्षणाच्या आधाराने शिक्षणामुळे स्वाभिमानी व स्वतंत्र विचारांचा माणूस घडला.तो जबाबदार व आदर्श नागरिक घडेल व आपल्या जमात बांधवांचा विकासासाठी झटेल,याचा महामानवांना फार विश्वास होता,मात्र यात आपण किती यशस्वी झालो....याचे आत्मचिंतन प्रत्येकांनी करायला हवे.स्वाभिमानाने व शिक्षणाने जागरूक झालेल्या मागास समाजातून राजकीय वारसदार काही प्रमाणात तयार होऊ लागले.अनुसूचित जाती,जमातीच्या व्यक्ती ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत समाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत.काबाडकष्ट,ढोर मेहनत, करून पालापाचोळ्यात जगणाऱ्या कुटुंबात वर्ग 4 ते वर्ग 1,कलेक्टर,सचिव,आयुक्त पदापर्यंत पोहोचला.हे सर्व संविधानातील आरक्षण व त्यांच्या अंमलबजावणी यामुळे शक्य झाले.बहुजन वर्गाच्या विकासाचा विकास प्रवाह खंडित न होता सातत्याने चालावा,त्यासाठी परिवर्तनाची चळवळ ही सतत निरंतर चालवत ठेवायची असते. अशा परिवर्तनवादी विचार,दिशा,चळवळी यांना सहकार्य करणे,खत पाणी घालणे,कार्यविस्तार वाढवणे,सामाजिक संघर्ष व्यापक'करणे असे प्रयत्न त्या त्या काळातील चळवळ चालवणार्यांनी करायचे असतात.डॉ.बा.आंबेडकर व त्या परंपरेतील समाजसुधारकांना अपेक्षित पिढी तयार करणे ही खरी चळवळ आहे.समाजातील आरक्षण लाभार्थी लोकांनी अशा चळवळीला रसद पुरवायची असते.संविधान निर्मितीनंतर समाजातील काही पिढ्यानी शिकून स्वतःचा व कुटुंबाचा विकास साधला,मात्र फुले-शाहू-आंबेडकर यांच्या कार्याचा विचार,संदेश,संघर्ष,चळवळ, पुढच्या पिढ्यांना मात्र त्यांना पोहोचवता आला नाही.सुखासीन झालेल्या पुढच्या पिढ्या सगळे आयते मिळाल्यामुळे त्यांच्यात जिद्द,संघर्ष,त्याग,चिकाटी,सामाजिक समर्पण,योगदान कमी पडत आहे.मात्र आजच्या पिढीमध्ये फुले-शाहू-आंबेडकर यांच्या कार्याबद्दल प्रचंड आस्था व आदर आहे. विश्वरत्न,भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या विचारांचे पालन व्हावे.वंचित,शोषित,मागासवर्गीय ,आदिवासी,भटका समाज यांचा विकास व्हावा.सुशिक्षित व जागरूक बुद्धिजीवी वर्गाने संघटन शक्ती मजबूत करायला हवी.जोपर्यंत जगाला,समाजाला,एकीचे बळ दाखवणार नाही.तोपर्यंत अन्याय अत्याचार कमी होणार नाहीत.या देशाचा सर्वश्रेष्ठ ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान.... त्याचे संवर्धन व जतन व्हावे...संविधान शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त माझे विनम्र अभिवादन.....🙏
 *दत्तात्रय अन्नमवाड
          नांदेड 
    मो.9860183370
     हिमायतनगर दत्ता पुपलवाड 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.