नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम अशोक चव्हाण यांच्या समवेतच्या बैठकीनंतर श्री. जयंत पाटील यांची सूचना - आ. जवळगावकरांची बैठकीत उपस्थिती-

मुंबई प्रतिनिधी/ जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांच्या समस्या मार्गी लावून प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांनी दिल्या आहेत. 
जलसंपदा विभागाच्या नांदेड जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसंदर्भात सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. अशोक चव्हाण आणि जलसंपदा मंत्री श्री. जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मंत्रालयात आज आढावा बैठक झाली. नांदेड जिल्ह्यातील जलसंपदा विभागाचे प्रलंबित विषय मार्गी लावण्यासाठी श्री. चव्हाण सातत्यपूर्ण पाठपुरावा करीत आहेत. त्यांच्या पाठपुराव्याला सकारात्मक प्रतिसाद देत श्री. पाटील यांनी मध्य गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या उपलब्ध जलसाठ्यातून हाती घ्यावयाच्या विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणी संदर्भात कालबद्ध कार्यक्रम आखून सर्व प्रकल्प कालमर्यादेत सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा मंत्र्यांनी यावेळी दिल्या. 

या बैठकीत नांदेड जिल्ह्यातील रेणापूर प्रकल्प, पिंपळढव साठवण तलाव, उर्ध्व पैनगंगा प्रकल्पांच्या कालवा दुरुस्तीचे काम, पैनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधाऱ्यांना प्रकल्पांचा भाग म्हणून मान्यता देणे, लेंडी प्रकल्पाच्या स्वेच्छा पुनर्वसनाचा शासन निर्णय निर्गमित करणे, बाभळी बंधारा गेटच्या संचलनाबाबत तेलंगणा राज्याशी चर्चा करणे व जलसंपदा विभागाच्या जागा शासकीय कामासाठी हस्तांतर करण्यासाठी मंजुरी देणे, अशा विविध कामांबाबत विस्तृत चर्चा झाली.  

बैठकीस आ. अमरनाथ राजूरकर, आ. माधवराव जवळगावकर, आ. शामसुंदर शिंदे, जलसंपदा विभागाचे सचिव विलास राजपूत, विशेष कार्य अधिकारी विजयकुमार गौतम, सहसचिव अतुल कपोले, सहसचिव र. रा. शुक्ला, उपसचिव वैजनाथ चिल्ले, जया पोतदार, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, औरंगाबाद मुख्य अभियंता जयंत गवळी आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.