टेंभुर्णीत महिलेच्या अंगावरील अडीच तोळे सोन्याचे दागिने लंपास


हिमायतनगर प्रतिनिधी/.तालुक्यातील टेंभुर्णीत एका महिलेच्या अंगावरील अडीच तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि.१२ तारखेच्या मध्यरात्रीला घडली आहे. या संदर्भात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला मात्र या बाबत पोलीस डायरीत नोंद झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मागील अनेक महिन्यापासून शहर व ग्रामीण भागात चोरीचे सत्र सुरु आहे, मात्र अद्याप घरफोडी प्रकरणातील एकाही चोरीचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले नाही. असे असताना चोरीच्या घटना ग्रामीण भागात सुरूच आहेत. दि.१२ जानेवारीच्या मध्यरात्री अंदाजे १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यानी टेंभुर्णी गावातील श्री बापूराव पाटील यांच्या घराला लक्ष केले. त्यांच्या घराचा दरवाजा कोंडीतून काढून आत शिरून घरातील कपाटा मधील सामान अस्ताव्यस्त फेकले. मात्र त्यांना येथे काहीही हाती लागले नाही, तेंव्हा चोरटय़ांनी गाढ झोपेत असलेल्या घरातील महिलेच्या अंगावरील अडीच तोळे सोन्याचे दागिने अंदाजे १ लक्ष २० हजार किमतीची पोत तोडून पळ काढला आहे.

हा प्रकार लक्षात महिलेने आरडा ओरडा केली असता घरातील व परिसरातील माणसे उठेपर्यंत चोरटे पसार झाले. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेबाबतची माहिती पोलिसांना देताच पोलिसांनी गावात येऊन पंचनामा करून तक्रार लिहून घेतली असल्याची माहिती येथील माजी सरपंच प्रल्हाद पाटील यांनी दिली. मात्र वृत्त लिहीपर्यंत यासंदर्भात पोलीस डायरीत कोणतीही नोंद झाली नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा तपास पोलिसांनी लावून अज्ञात चोरट्यास गजाआड करावे आणि गावकर्यांना सुरक्षा द्यावी अशी मागणी गावकर्यांनी केली आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.