कारला जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची पंढरपूर वारी टाळ मृदुंगाचा गजर गाव दुमदुमले
0
July 27, 2026
हिमायतनगर प्रतिनिधी :/ हिमायतनगर तालुक्यातील कारला येथील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी साकारलेल्या पंढरपूर वारी आणि दिंडी सोहळ्याने संपूर्ण गाव भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाले. टाळ-मृदंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि विठ्ठल-रुक्मिणीच्या आकर्षक देखाव्यासह काढण्यात आलेल्या पालखी सोहळ्याने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून हातात टाळ, मृदंग, वीणा आणि पालखी घेत हरिनामाचा गजर करत गावातून भव्य दिंडी काढली. तुळस डोक्यावर घेऊन सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर वारीचा अनुभव जिवंत केला. गावातील नागरिकांनी ठिकठिकाणी दिंडीचे स्वागत करून पालखीचे पूजन केले तसेच विद्यार्थ्यांवर फुलांचा वर्षाव करत त्यांचे कौतुक केले.
कारला जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सांस्कृतिक व धार्मिक परंपरांशी निगडित उपक्रम नियमितपणे राबविले जातात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, सामाजिक बांधिलकी, भक्तीभाव आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्याची प्रेरणा दिली जाते.
या दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण कारला गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून शाळेच्या मुख्याध्यापिका आशाताई बोयले, सहशिक्षक शुभम धनुसकर, अंजली उमाटे, विठ्ठल सुर्यवंशी, यांनी विद्यार्थ्यांची सजावट केली.विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे आणि शाळेच्या अभिनव उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले.
Tags
