पार्श्वनाथ महादेव यात्रा उत्सव ५ जानेवारी पासुन भजन, क्रीडा स्पर्धा जंगी कुस्त्यांची दंगल ..

हिमायतनगर प्रतिनिधी / हिमायतनगर तालुक्यातील सवना (ज.), रमणवाडी, जिरोणा, गणेशवाडी, गणेशवाडी तांडा, महादापुर, दगडवाडी, चिंचोर्डी, एकघरी, वाशी, पार्डी (ज.), पिछोडी आदी परिसरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पाच शिव महादेव फाटा येथील पार्श्वनाथ महादेवाची वार्षिक यात्रा दि. ५ ते ९ जानेवारी या कालावधीत मोठ्या भक्तिभावात संपन्न होणार आहे.
 
दि. ५ जानेवारी रोजी सकाळी महाअभिषेकाने यात्रेची सुरुवात होणार असून, दुपारी महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे. महाप्रसादानंतर लेझीम स्पर्धा होणार असून, प्रथम बक्षीस ७००१ रुपये जिरोणा येथील सरपंच सौ. अनुसयाबाई बळवंत जाधव यांच्या वतीने, द्वितीय बक्षीस ३००० रुपये सोनबा अनगुलवार व सुभाष बळीराम राठोड यांच्या कडून, तर तृतीय बक्षीस १५०१ रुपये कु. भाविका परशुराम विठ्ठलवाड यांच्या तर्फे देण्यात येणार आहे. रात्री भक्तिमय भजनाचा कार्यक्रम होणार आहे.

नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांच्या वतीने यात्रेसाठी २१ हजार रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली आहे. दि. ६ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती व यात्रा कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पशुप्रदर्शन होणार असून, देशी बैलजोडी, देशी गाय, वळू व कालवड गटांचा समावेश राहणार आहे. पशुपालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन पशुसंवर्धन अधिकारी डॉ. योगेंद्र येवतीकर यांनी केले आहे. याच दिवशी व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच दुपारी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.

दि. ७ जानेवारी रोजी शंकरपट स्पर्धा होणार असून, जनरल गटातील प्रथम बक्षीस २५ हजार रुपये आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या वतीने देण्यात येणार आहे. तसेच डॉ. गटातील स्पर्धांसाठीही आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. दि. ९ जानेवारी रोजी दुपारी कुस्ती स्पर्धेने यात्रेचा समारोप होणार असून, कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते होणार आहे.

यावेळी खासदार नागेश पाटील आष्टिकर, शिवसेना उपनेते हेमंत पाटील, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, माजी खा. सुभाष वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विविध वजनगटातील कुस्त्यांसाठी आकर्षक रोख बक्षिसे जाहीर करण्यात आली आहेत. या पवित्र यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन पार्श्वनाथ महादेवाचे दर्शन व आशीर्वाद घ्यावेत, असे आवाहन यात्रा कमिटीचे यात्रेत सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष परमेश्वर गोपतवाड, उपाध्यक्ष कामणराव वानखेडे, गणेशराव भुसाळे,गुणाजी आडे,सत्यवृत ढोले, प्रकाश जाधव, नागोराव बुरकूले, गोविंद काळे, आनंद बोलसटवार यांच्या सह कमिटीने केले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.