हिमायतनगर प्रतिनिधी /आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच नगरपंचायत निवडणुका लक्षात घेता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची निवडणूकपूर्व तयारी पूर्ण झाली असून, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्ष निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज आहे, अशी माहिती मराठवाड्याचे लोकनेते तसेच लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बोलताना दिली.
आमदार चिखलीकर हे किनवट दौऱ्यावर जात असताना हिमायतनगर येथे थोडावेळ थांबले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, “वरिष्ठ पातळीवर महायुतीची सत्ता आहे. मित्रपक्षाकडून प्रस्ताव आल्यास त्यावर विचार करू, मात्र असा प्रस्ताव न आल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविण्यास सिद्ध आहे.”
यानंतर हिमायतनगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मुख्य कमानिजवळ आमदार चिखलीकर यांचे तसेच जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावणगावकर यांचे जंगी स्वागत करण्यात आले.
या वेळी कार्यकर्त्यांनी “अजित दादा तूम आगे बढो... हम तुम्हारे साथ है!” “आमदार प्रताप पाटील चिखलीकर तुम आगे बढो... हम तुम्हारे साथ है!” अशा घोषणा देत संपूर्ण परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणांनी दुमदुमून गेला.
स्वागत सोहळ्यात विधानसभा अध्यक्ष एकनाथराव पाटील बोरगावकर, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक लुटे, तालुकाध्यक्ष वामनराव पाटील, शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे, अभिलाष जयस्वाल, जितू सेवनकर, विशाल भाऊ शिंदे, सदाशिव काळे, बास्टेवाड, गायकवाड, टेकेवाड, आदींसह शहर व ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमात आगामी निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळविण्याची इच्छा असलेले संभाव्य उमेदवारही मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या भेटीमुळे तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे.
