शांतता व निर्भय वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडेल यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करावे
नांदेड, दि. 8 नोव्हेंबर: नांदेड जिल्ह्यातील देगलूर, भोकर, धर्माबाद, किनवट, उमरी, हदगाव, मुखेड, कंधार, बिलोली, कुंडलवाडी, मुदखेड, लोहा नगरपरिषद तसेच हिमायतनगर नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून संबंधित क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कालावधीत कुठेही तणावाची परिस्थिती निर्माण होऊ नये, तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी आवश्यक ती दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याबाबत निवडणूक सनियंत्रण समितीची आढावा बैठक 8 नोव्हेंबर संपन्न झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, जिल्हा सहआयुक्त गंगाधर इरलोड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आदीची उपस्थिती होती. तसेच सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, नगरपरिषद/नगरपंचायतींचे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच मुख्याधिकारी हे प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवार, 10 नोव्हेंबरपासून नामनिर्देशन प्रक्रिया सुरू होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निवडणूक व्यवस्थापनासाठी आवश्यक समित्या व पथके स्थापन करावीत. या पथकांमार्फत शहरांमध्ये सतत निगराणी ठेवावी. पेड न्यूज, इंटरनेट, सोशल मीडिया व माध्यमांवर लक्ष ठेवावे, तसेच रोकड, अवैध मद्यसाठा, अंमली पदार्थ व शस्त्र वाहतूक यावर प्रतिबंध ठेवण्यासाठी कार्यवाही करावी. या कार्यवाहीचे दैनंदिन अहवाल जिल्हास्तरावर सादर करावेत, असे निर्देश त्यांनी दिले.
निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक अधिकारी यांनी मतदान केंद्रांना भेट देऊन आवश्यक सुविधा तपासाव्यात आणि उणीव असल्यास तात्काळ दुरुस्त कराव्यात, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांनी सांगितले की, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर आवश्यक समित्यांची स्थापना करून राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कार्यवाही करावी. एकल खिडकी प्रणालीद्वारे परवानग्या देण्याची प्रक्रिया सुलभ करावी, तक्रार निवारण कक्ष स्थापन करावेत. शांत, निर्भय वातावरण निर्मितीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. तसेच उमेदवारांना नवीन बँक खाते उघडण्यासाठी बँकांनी सहकार्याची भूमिका घ्यावी, असेही त्यांनी सांगितले.
०००००
