हिमायतनगर प्रतिनिधी/-/पोटा/वडगांव/सोनारी/जवळगांव/ कामारी गत तिन महिन्यातील अतिवृष्टीत शेतकरी व भूमिहीन शेतमजूरांचे मोठे हाल होत असून त्यांना तातडीने आर्थिक मदतीसह हाताला काम द्या अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कामारीकरांनी केली असून
निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांची सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा.भवरे कामारीकर,वैभव नरवाडे यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाने भेट घेतली व याबाबत निवेदन देऊन सविस्तर चर्चा केल्यानंतर त्यांनीही यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
गत तिन महिन्यातील अतिवृष्टीत पैनगंगा व लाखाडी नदीच्या संगमावर वसलेल्या कामारी येथील शेतजमीनी पाण्याखाली आल्यामूळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले असून अनेक घरे पडली आहेत. पशूधनही संकटात आहे. शेतकऱ्यांसह मोठ्या प्रमाणात असलेला भूमिहीन शेतमजूर याठिकाणी आर्थिक संकटात सापडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामूळे पाण्याखाली असलेल्या व मुख्यत्वे नदीकाठाच्या सर्व शेतजमिनी,पशूधन व नुकसानग्रस्त घरे,दुकाने इ.चे त्याचबरोबर,येथिल भूमिहीन शेतमजूर यांचेही तातडीने सर्व्हेक्षण करुन त्यांना सरसकट आर्थिक मदत द्यावी तसेच, त्यांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आलेली असून या निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव मा.भवरे, वैभव नरवाडे,नथुराम कांबळे,भगवान शिंगणकर, बाबासाहेब नरवाडे,विनोद नरवाडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
