हिमायतनगर प्रतिनिधी / तालुक्यातील शुक्रवारी (ता. 26) सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसात बोरगडी शिवारात वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. कष्टकरी शेतकरी प्रभाकर संभाजी भाकरे यांच्या गट क्र. 212 शिवारातील गोठ्यावर वीज कोसळल्याने गाय गंभीर तर एका वासराचा जागीच मृत्यू झाला आहे तर पारडी येथील शेतकऱ्यांच्या सात म्हैस दोन बैल पुराच्या पाण्यात वाहून गेले होते यातील सहा म्हैस तर दोन बैल वाचविण्यात यश आले तर एक म्हैस अद्यापही सापडली नाही या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.
तिर्थक्षेत्र बोरगडी येथील शिवारात विज पडून शेतकरी प्रभाकर भाकरे यांच्या शेतातील महत्त्वाचे साहित्य – मोटारपंप, पाईप, पिकलर, खत व इतर शेतीसाठी वापराचे साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. या अचानक झालेल्या नुकसानीमुळे भाकरे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दुपारी दोन ते तीन वाजेदरम्यान झालेल्या अतिवृष्टीसदृश्य पावसामुळे हिमायतनगर तालुक्यातील पारडी शिवारातील शेतकरी राजू विठ्ठल रौतुलवाड यांच्या गट क्र. 84 मधील शेतशिवारातील आखाड्यावर सात म्हशी पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना घडली. स्थानिकांनी केलेल्या शोधाशोध नंतर सहा म्हशी आढळून आल्या आहेत, मात्र एक म्हैस अजूनही बेपत्ता असून, यामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाल्याचे पारडी येथील नागरिकांनी सांगितले आहे.
गेल्या आठवड्याभरापासून महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यात जोरदार पावसाचा धडाका सुरू असून विजांचा कडकडाट व वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना आधीच अठरा विश्व दारिद्र्याचा सामना करावा लागत असताना नैसर्गिक आपत्तीमुळे उभे राहणे कठीण झाले आहे.
या घटनेबाबत स्थानिक शेतकरी वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असून, तात्काळ पंचनामा करून योग्य ते नुकसानभरपाई मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी वर्गाने प्रशासनाकडे केली आहे.
