राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमीत्त बाल सुसंस्कार शिबीराचा रामधून रैलीने झालायं थाटात समारोप

हिमायतनगर प्रतिनिधी/ तन-मन, धन से सदा सुखी हो भारत देश हमारा या उद्देशाला सध्या करण्यासाठी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमीत्त हिमायतनगरात आयोजित बाल सुसंस्कार शिबीर सप्ताहांचा रामधून रैलीने आज समारोप करण्यात आला. या शिबिरात जवळपास ७५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन भजन, किर्तन सामुदायिक ध्यान, प्राणायाम, योग्य, बौद्धिक सत्र यासह विविध विषयाचे ज्ञान घेतले.

लहान पणी आश्रमी न्यायी मुले।
जैसे विश्वमित्र्य राम-लक्ष्मण गेले।
सांधीपणी द्रौणानी शिकविले ।
तैसे विविध ज्ञान द्यावे ।।... ग्रामगीता
त्यांना सहवास उत्तम द्यावा ।
दर्जा जीवनाचा वाढवावा।
त्याने समाज होईल नवा ।
ज्ञानवंताचा निर्माण ।।... ग्रामगीता

ग्रामगीतेत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेल्या ओवीप्रमाणे बालकामध्ये सुसंस्कार रुजविण्यासाठी मागील ४ वर्षांपासून हिमायतनगर येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने बालसुसंस्कार शिबिराचे आयोजन केलं जाते. त्याचं पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहरातील जतनबाई शेखावत आश्रम शाळा येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. बाल सुसंस्कार शिबिराची सुरुवात दि.१६ नोव्हेंबर रोजी श्रीराम संभाजी वाळके यांच्या हस्ते दिप प्रज्वलना ने झाली. सप्ताहभर प्रातः स्मरण:, सामुदायीक ध्यान, योगासन, प्राणायम, बौध्दीक सत्र, भजन संगीत, कृषी विषयक मार्गदर्शन, सैनिक भरती, पोलीस भरती, व्यापार, गो- पालन विषयी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन, ग्रामगीता काळाची गरज, लाठी काठी प्रशिक्षण, ओळख सुंदर जीवनाची, किर्तन व राष्ट्रवंदना अश्या प्रकारे दैनंदिन कार्यक्रम या शिबीरात संपन्न झाले.

शिबिरात विद्यार्थ्यांनी घेतलेलं मार्गदर्शन व बौद्धिक ज्ञानाचा वापर चांगला समाज व नवभारत घडविण्यासाठी करावा असे आवाहन नांदेडचे जिल्हा कृषी अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी शिबिराच्या समारोप प्रसंगी केले. यावेळी मंचावर वैराग्यमुर्ती चैतन्य महाराज (कोंडदेव आश्रम, कांडली), ह.भ.प. ग्रामगिताचार्य सुनिल महाराज लांजुळकर, ह.भ.पं. ग्रामगीताचार्य वेदांत महाराज अकोटकर, संचलन ह.भ.प.गोपाळराव महाराज मुळझरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.  

शेवटच्या दिवशी म्हणजे दि. २२ नोव्हेंबर रोजी शहरातील मुख्य रस्त्याने रामधून रैली काढण्यात आली. यात शिबिरार्थी विद्यार्थी, गुरुदेव सेवा मंडळाचे कार्यकर्ते व नागरिकांनी सहभाग घेतला होता. सदर शोभायात्रा पळसपूर रस्त्यावरील आश्रम शाळा ते श्री परमेश्वर मंदिर व शहरातील मुख्य रस्त्याने संत तुकडोजी महाराज ध्यान केंद्रापर्यंत काढण्यात आली. शोभायात्रा ध्यानकेंद्रापर्यंत आल्यानंतर येथे सामूहिक प्रार्थना झाल्यानंतर भव्य महाप्रसाद वितरण करून शिबिराचा समारोप करण्यात आला.

सदर बालसुसंस्कार शिबीर यशस्वी करण्यासाठी गुरु देव सेवा मंडळ, हिमायतनगर, जवळगांव, टेंभी, आंदेगाव, सवना, मुरझळा, महादापूर, कारला. बोरगडी, बोरगडी तांडा, धानोरा, पळसपूर, सिरंजनी, पारवा, खडकी बा., पार्डी, भीश्याचीवाडी, पवना, पोटा, कोल्हारी, भीसी, कोसमेट, कुपटी, कांडली (ता. भोकर), सावरगांव, लगळूद, नांदा, जांबदरी टेकडी गुरुकुल, संच, सर्व ग्रामगीता प्रचारक व समस्त गावकरी मंडळी तसेच हिमायतनगर (वाढोणा) शहरातील अन्नदाते, सहयोग दाते मंडळींचे सहकार्य लाभले असल्याचे गोविंद कदम, परमेश्वर इंगळे, विठ्ठलराव देशमवाड यांनी सांगितले आहे.  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.