हिमायतनगर प्रतिनिधी/ मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून दिवसेंदिवस समाज बांधवांची भुमिका अधिक तीव्र होत असतांना हिमायतनगर सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी शहरात कडकडीत बंद ठेवून राज्य रस्त्यावर टायर जाळून आंदोलन करीत सरकारचा निषेध व्यक्त केला आहे.
हिमायतनगर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने बुधवारी शहरात बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्या आवाहनाला व्यापारी बांधवानी आठवडी बाजार असतांना देखील दुकाने कडकडीत बंद ठेवून मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.नांदेड किनवट राज्य रस्त्यावर मराठा समाजाच्या आंदोलकांनी टायर जाळून आंदोलन केले. काही वेळ वाहतूक बंद झाली होती.
पोलीस प्रशासन आणि मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या आव्हानाला मराठा आंदोलकांनी प्रतिसाद देत कुठल्याही प्रकारचे हिसंक वळण लागणार याची दक्षता घेतली होती. त्यानंतर दिवसभर शहरात शांतता पुर्ण आंदोलन झाले. साखळी उपोषण स्थळी भजन गायनाचा कार्यक्रम सादर झाला.
या कार्यक्रमात शाहीर वानखेडे ,शिलेवाड यांनी राजकीय नेत्यांना गायणातून धोबीपछाड केले.या साखळी उपोषणाला पळसपूर येथील मराठा बांधवांचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने मराठा महिला पुरूष उपस्थित होते. हिमायतनगर बरोबरच तालुक्यातील घारापुर, सोनारी फाटा येथे मराठा बांधवांनी शांततेत आंदोलन रास्ता रोको केला होता. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अन्यथा राजकीय नेत्यांना गावात फिरकू देणार नाही असा पवित्रा मराठा समाजानी घेतला आहे. साखळी उपोषण स्थळी शहरासह तालुक्यातील मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सदरील आंदोलनास पोलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलना दरम्यान शहरात कुठल्याही प्रकारची घटना घडली नाही
शांततेच्या वातावरणात मराठा आंदोलन झाले असल्याचे पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर यांनी सांगितले.
