कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी 94.35 टक्के मतदान.... आ. जवळगावकर, माजी आ.आष्टीकर, कोहळीकर दिवसभर मतदान केंद्रावर उन्हात तळ ठोकून

     हिमायतनगर प्रतिनिधी/ कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाले असून तालुक्यातील सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल मापाडी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.या निवडणूकीत तिरंगी लढत झाली असून अतिशय चुरशीची निवडणूक होती. मतदान केंद्रावर आजी-माजी आमदार दिवसभर भर उन्हात तळ ठोकून होते .

हिमायतनगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी दि. 28 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजता मातोश्री जतनबाई शेखावत आश्रम शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतादनाची वेळ होती.दिवसभरात सोसायटी मतदारसंघाचे एकूण मतदान 276 पैकी 274 झाले , ग्रामपंचायत मतदारसंघाचे 387 पैकी 269 ऐवढे मतदान झाले, हमाल मापाडी 205 पैकी 170 मतदान झाले आहे तर ,व्यापारी मतदारसंघाला 389 पैकी 373 ऐवढे मतदान झाले असून येथील मतदान केंद्रावरील निवडणुक अधिकाऱ्यांनी एकूण 94.35 टक्के मतदान झाले असल्याची माहिती दिली आहे. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुक रिंगणात 18 जागेसाठी 52 उमेदवार होते. राष्ट्रीय कांग्रेस स्वबळावर होते , उध्दव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस युती होती तर भारतीय जनता पार्टी, बाळासाहेबाची शिवसेना या पक्षांच्या उमेदवारांनी निवडणुक लढवली आहे. मतदान ओढून घेण्यासाठी उमेदवारांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली असली तरी पक्षाच्या निष्ठावंत आणि नाराज असणाऱ्या कार्यकर्त्यांची परिक्षा निकालानंतर कळणार आहे. मतदान केंद्रावर सकाळ पासून अतिशय शांततेत मतदान झाले कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडला नाही. विशेष म्हणजे दिवसभर आपल्या मतदान केंद्रा जवळ पक्षाच्या स्टाल मध्ये विद्यमान आ. माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ. नागेश पाटील आष्टीकर, शिवसेना माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर दिवसभर उन्हात तळ ठोकून होते. तिन्ही नेत्यांनी कार्यकर्त्यां मार्फत लावलेली फिल्डिंग देखील आजच्या निकालातून उघडणार आहे.या निवडणुकीतील 52 मतदारांचे भविष्य मतपेटीत बंद झाले असून आज कुणाचा गुलाल उधळणार यातून दिसणार आहे. या निवडणुकीचे निवडणुुुक निर्वाचन अधिकारी चंद्रकांत मगर, सहायक निबंधक लक्ष्मण डवरे, दिगंबर पाटील, सचिव नागोराव माने, यांच्यासह हदगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे कर्मचारी, सचिव यांनी काम पाहिले,  मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस निरीक्षक बि. डी. भुसनूर, सहायक पोलीस निरीक्षक महाजन यांनी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.