हदगाव- हिमायतनगर विधानसभा मतदार संघात कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांच्या रुपाने विकासाचा सूर्य उदयास येत होता. उमरते नेतृत्व म्हणून त्यांची ओळख सर्वदूर पसरत होती. एक कर्तबगार नेता म्हणून त्यांनी मना मनात आपली प्रतिमा निर्माण केली होती. आपला भावी आमदार म्हणून लोक त्यांना ओळखू लागले होते. मात्र निष्ठूर काळाला ते देखवले नाही. हदगाव- हिमायतनगर तालुक्याच्या विकासाचा हा सूर्य अकाली अस्तास गेला. त्यांचे स्मरण झाले नाही, असा एकही दिवस कुणाचा जात नाही. आज त्यांचा २० या स्मृतीदिन दिन.
कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांची शेतकऱ्यांसह सामान्य जनतेशी नाळ बांधलेली होती. एक उमदे नेतृत्व म्हणून
हदगाव- हिमायतनगर तालुक्यातील नागरीक त्याच्याकडे पाहत असत. कोणतेही पद नसतांना त्यांनी या भागासाठी केलेले कार्य अगदी लौकीकप्राप्त आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका गंगेसारखी नितळ- निर्मळ आणि प्रामाणिक होती. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस हाच होता. त्यामुळेच लहान- थोरांना ते आपलेसे वाटत. दिलदार व्यक्तीमत्व, जाणता नेता म्हणून ते ओळखले जावू लागले होते. विकासाचे प्रश्न मार्गी लागले पाहीजेत, सामान्यांचे प्रशासनाच्या दरबारी अडले नडलेले कामे झाली पाहीजेत, समस्या कोणतीही असो, ती सुटलीच पाहीजे, या तळमळीने ते काम करीत असत. हाती घेतलेले काम पूर्ण केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नसत. प्रसंगी मंत्री, वरिष्ठ नेते मंडळीकडे जावून सामान्यांचे प्रश्न ते धसास लावत.
वडील कै. माजी आमदार निवृत्तीराव पाटील जवळगावकर यांच्या विचार आणि कार्याचा वारसा
कै. पंजाबराव पाटील जवळगावकर समर्थपणे पुढे चालवित होते. राज्याच्या विकासाच्या नकाशात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघाचे नाव ठळकपणे उमटून दिसले पाहीजे, असे स्वप्न त्यांनी आपल्या उराशी बाळगलेले होते. आरोग्य, शिक्षणाच्या मुबलक सुविधा निर्माण व्हाव्यात, मुलभूत सोयी उपलब्ध व्हाव्यात, रोजगाराच्या संधी निर्माण व्हाव्यात, सिंचनाचे क्षेत्र वाढावे असा विकासाचा विविध अजेंडा त्यांच्याकडे होता. परंतु एका रस्ते अपघातात काळाने त्यांना हिरावून नेले. एका कर्तबगार नेतृत्वाला जनता पोरकी झाली. बंधू कै. पंजाबराव पाटील यांचे विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आ. माधवराव पाटील जवळगावकर हे आज नेटाने सांभाळत आहेत. कै. पंजाबराव पाटील जवळगावकर यांचा आज २० वा स्मृतीदिन. त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन !
परमेश्वर गोपतवाड ( जेष्ठ पत्रकार)
- सोपान बोंपीलवार ( पत्रकार)
