हिमायतनगर प्रतिनिधी/ भारतरत्न आणि भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचं निधन झालं आहे. मंगेशकर यांच्या निधनाची बातमी कळताच कलाक्षेत्रासह राजकीय क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. लतादीदींच्या मधुर आवाजात लोकांना मंत्रमुग्ध करण्याची अतुलनीय क्षमता होती ती आता हरवली असुन संगीत क्षेत्रातील आवाज हरपला असल्याचे हदगाव-हिमायतनगर विधानसभेचे आ. माधवराव पाटील जवळगावकर व्यक्त करीत श्रध्दांजली अर्पण केली आहे.
ज्येष्ठ गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे. संगीत जगतातील एका युगाचा अंत झाला. त्या सुरांमधून आपल्यात कायम राहतील, अशा शब्दांत अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आहे. अनेक दशकं भारतात आणि भारताबाहेर संगीत रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आवाज आज हरपला आहे. संगीत क्षेत्रातील ध्रुवतारा निखळला, अशा शब्दात हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आ. माधवराव पाटील जवळगावकर यांनी शोक व्यक्त केला.
