हिमायतनगर रेल्वे स्थानकाचे बदलले रूप; रंगरंगोटी व हिरवाईने प्रवाशांचे वेधले लक्ष...


सोपान बोंपीलवार हिमायतनगर प्रतिनिधी /: एकेकाळी अस्वच्छता, दुर्गंधी आणि दुर्लक्षित अवस्थेमुळे प्रवाशांना थांबणेही नकोसे वाटणारे हिमायतनगर रेल्वे स्थानक आता आकर्षक आणि नयनरम्य रूपात सजले आहे. रेल्वे प्रशासनाने हाती घेतलेल्या सुशोभीकरण आणि विकासकामांमुळे स्थानकाचा संपूर्ण परिसर नव्या रूपात खुलून आला असून प्रवाशांकडून या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गेल्या काही वर्षांपासून स्थानकाची दुरवस्था झाली होती. परिसरात स्वच्छतेचा अभाव असल्याने दुर्गंधी पसरत असे आणि प्रवाशांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, मागील वर्षापासून रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या विकासाला गती देत विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. पूर्वी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी प्रवाशांना जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडावे लागत होते. आता नव्याने उभारण्यात आलेल्या पादचारी पुलामुळे (फूट ओव्हर ब्रिज) प्लॅटफॉर्म बदलणे सुरक्षित, सोयीचे आणि सुलभ झाले आहे. स्थानकाच्या प्रवेशद्वारावर आकर्षक कमान उभारण्यात आली असून प्रशस्त पार्किंग व्यवस्था, सुबक बाग, हिरवाईने नटलेला परिसर आणि संपूर्ण स्थानकाची देखणी रंगरंगोटी यामुळे हिमायतनगर रेल्वे स्थानकाला आधुनिक आणि मनमोहक स्वरूप प्राप्त झाले आहे. स्थानकात येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांचे हे बदललेले रूप विशेष लक्ष वेधून घेत आहे. रेल्वे प्रशासनाने केलेल्या विकासकामांमुळे प्रवाशांच्या सुविधांमध्ये मोठी भर पडली असून स्थानिक नागरिक व प्रवाशांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा हा कायापालट परिसराच्या सौंदर्यात भर घालणारा ठरत असून भविष्यातही अशाच सुविधा उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा प्रवाशांनी व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.