हिमायतनगर प्रतिनिधी / शहरात दि. १० डिसेंबर मंगळवारी बांगलादेशी हिंदूसाठी न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हिंदुत्ववादी संघटनांबरोबरच सर्व व्यापाऱ्यांनी बांधवानी आपली प्रतिष्ठाने बंद ठेऊन अत्याचाराचा निषेध करत या प्रकरणी मानवाधिकार आयोगाने लक्ष घालावे. या प्रमुख मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांच्या मार्फत पंतप्रधान यांच्याकडे पाठविण्यात आले आहे.
मंगळवारी सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाची सुरूवात येथील श्री परमेश्वर मंदिरासमोर हनुमान चालीसा पठण करून झाली. शहरातील मुख्य रस्त्याने हाती निषेधाचे विविध संदेश देणारे फलक घेऊन शेकडोच्या संख्येने सकल हिंदू समाजातील युवक, जेष्ठ नागरिक सामील झाले होते.बांगलादेशात हिंदूवरच नाही तर अन्य अल्पसंख्यक समुदायावर अनन्वित्त अत्याचार केले जात आहेत.तरीदेखील राष्ट्र व मानवाधिकार संयुक्त परिषद यावर सोयीस्कर रित्या दुर्लक्ष करीत आहे. बांगलादेशात हिंदू संत, मंदिर, हिंदू संस्था असुरक्षित असून, दररोज हल्ले होत आहेत.
निषेध रैली परत श्री परमेश्वर मंदिरासमोर आल्यानंतर येथे उपस्थित हिंदू समाजाला मार्गदर्शन केल्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार ताडेवाड यांना देण्यात येऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला. या मोर्चात हजारोच्या संख्येने सकल हिंदू समाजबांधव सामील झाले होते. दिवसभर शहरातील बाजारपेठ कडकडीत बंद होती. मोर्चा शांततेत संपन्न होण्यासाठी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमोल भगत यांनी चोख बंदोबस्त लावला होता.
