प्रदूषणमुक्त गणेश उत्सव काळाची गरज -पोलीस अधिक्षक शेवाळे

देगलूर (वार्ताहर) प्लास्टर ऑफ पॅरिस सारख्या वस्तूंपासून तयार केलेल्या गणेश मूर्तींचे वेगवेगळ्या जलसाठ्यात विसर्जन केले तर जलसाठे प्रदूषित होतात. या प्रदूषित पाण्याचे अत्यंत वाईट परिणाम येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागतात; त्यामुळे "प्रदूषण मुक्त आणि पर्यावरण युक्त" गणेश उत्सव साजरा करणे ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले. ते दि. 27 ऑगस्ट रोजी शहरातील राजशेखर मंगल कार्यालयात आयोजित शांतता समिती व सामाजिक समन्वय समितीच्या बैठकीत बोलत होते.
      दि. 27 ऑगस्ट रोजी शहरातील राजशेखर मंगल कार्यालयात विविध सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समिती व सामाजिक समन्वय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे उपस्थित होते. शांतता समितीच्या बैठकीचे प्रास्ताविक पोलीस निरीक्षक सोहन माछरे यांनी केले. त्यानंतर माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार, मुफ्ती मुख्तारोद्दीन, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, अँड ‌ मोहसीन अली, धोंडीबा मिस्त्री, शैलेश उल्लेवार यांची समायोचित भाषणे झाली. याप्रसंगी पुढे बोलताना प्रमोद कुमार शेवाळे म्हणाले की, अनेकजण डीजे वाजवण्यास परवानगी मागत आहेत; परंतु डीजेवर सुप्रीम कोर्टानेच बंदी घातलेली असल्यामुळे कोणत्याही परिस्थितीत डीजे वाजविण्यास मान्यता देण्यात येणार नाही. गणेश उत्सव हा आनंदाचा सण आहे.याचे भान ठेवून सर्व गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणेश मंडळाच्या परिसरात एवढे चांगले आणि भक्तिमय वातावरण तयार करावे की, तेथे येण्यास युवती- स्त्रियांना संकोच वाटू नये किंवा भीती वाटू नये. गणेश मंडळासमोर नाचल्यामुळेच भक्ती प्रकट होते असे नाही तर भक्तीमय वातावरण तयार करण्यासाठी विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्याची गरज आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अति उत्साहाच्या भरात कोणतेही चुकीचे पाऊल उचलून नये." कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे" असा इशाराही त्यांनी याप्रसंगी उपस्थित असलेल्या गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी बोलताना अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चीत चांडक म्हणाले की, स्वातंत्र्यलढ्यात गणेश भक्तांचे सहकार्य लाभावे आणि स्वातंत्र्याचा लढा आणखी बळकट व्हावा या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेश मंडळाची स्थापना केली. उदात्त हेतूने सुरू झालेल्या गणेश महोत्सवाला गालबोट लागेल असे कोणतेही वर्तन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी करू नये. 

,// माजी नगरसेवक अविनाश निलमवार यांच्या श्रीकृष्ण गणेश यादव गणेश मंडळाच्या वतीने कै. मष्णाजीराव निलमवार यांच्या स्मरणार्थ दि. 4 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्या शिबिराच्या पोस्टरचे पोलीस अधीक्षक प्रमोद कुमार शेवाळे यांच्या हस्ते याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. //


शांतता समितीच्या बैठकीला शहर आणि तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणेश मंडळाचे पदाधिकारी, डॉक्टर, वकील, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.