हिमायतनगर प्रतिनिधी/विदर्भ - मराठवाड्याच्या सीमेवरून वाहणाऱ्या पैनगंगा नदी काठच्या काही रेती घाटावरून राजकीय वरदहस्त असलेल्या वाळू माफियांकडून शासनाचा महसूल बुडवत रेतीचा गोरखधंदा राजरोसपणे सुरु आहे. शासनाने नदीकाठावरील ७ रेती घाटाच्या लिलावाचे टेंडर काढले असताना देखील रेती चोर सक्रिय असल्याचे दिसते आहे.याकडे हिमायतनगर तहसिलने नेमलेले तिन्ही बैठे पथकाने दुर्लक्ष केल्याने रेतीचा गोरखधंदा सुरूच आहे. दि.१० च्या रात्रीला मिळालेल्या गुप्त माहिती वरून हदगाव उपविभागीय अधिकाऱ्याच्या पथकाने बोरगडी - हिमायतनगर रोडवर विनापरवाना रेतीची वाहतूक करताना ट्रैक्टर पकडून कार्यवाही केली आहे. यामुळे हिमायतनगर तहसीलच्या गौण खनिज विभागातील अधिकारी - कर्मचाऱ्याचा सुरु असलेला भोंगळ कारभार उघड झाला आहे.
हिमायतनगर तालुका पैनगंगा नदीकाठावर आहे, या नदीकाठावर एकूण १२ शासकीय रेतीघाट तर रेती माफियांनी स्वतःच्या फायद्यासाठी निर्माण केलेले अनेक रेती घाट आहेत. शासनाच्या महसूल अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी यांना हाताशी धरून महिनेवारी एका ट्रैक्टरला हप्ता ठरवून रात्री - अपरात्रीला रेती, मुरुमाची चोरी केली जात आहे. खरे पाहता टेंडर भरून रॉयल्टी घेतल्यानंतर देखील गौण खनिज अधीनियमानुसार सकाळी सूर्योदय ते रात्री सूर्यास्तापूर्वी गौण खनिज काढण्याची परवानगी असते त्यामुळे रात्रीला उत्खनन करणे कायद्याने गुन्हा आहे. परंतु कोणतीही परवानगी नसताना या सर्व नियमांना बगल देऊन गौण खनिज काढून शासनाला चुना लावण्याचे काम हिमायतनगर तालुक्यातील गौण खनिज तस्कर करत आहेत.
हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर कामारी, पिंपरी, दिघी, विरसनी, रेणापूर बे, घारापुर, धानोरा ज, डोल्हारी, बुदली बे, पळसपूर, शिरपल्ली, कोठा ज असे १२ रेती घाट आहेत. त्यापैकी ७ रेती घाटाच्या लिलावासाठी मंजुरी मिळली आहे. तर अन्य ५ रेती घाटाच्या लिलावालाही लवकरच मंजुरी मिळणार असल्याचे हिमायतनगर तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक सिद्धार्थ कुलदीपके यांनी दिली.
उपविभागीय अधिकारी पथकाच्या कार्यवाहीत संबंधित वाहनास सव्वा लाखाच्या दंडाची नोटीस
हिमायतनगर तालुक्यात विना परवाना रेतीची चोरी केली जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावरून हदगाव उपविभागीय अधिकारी यांचे पथक प्रमुख बी बी हंबर्डे, महसूल सहाय्यक विशाल शेवाळकर, शिपाई नागेश कोकरे यांनी दि.१० गुरुवारच्या रात्री ९.४० वाजेच्या सुमारास बोरगडी - हिमायतनगर रोडवर विनापरवाना रेतीची वाहतूक करताना एक विना नंबरचे ट्रैक्टर पकडून कार्यवाही केली. आणि तात्काळ सदरचे वाहन पोलीस ठाण्यात लावले आहे. हिमायतनगर तहसिलने संबंधित ट्रैक्टर वाल्यास विनापरवाना रेतीची वाहतूक केल्याप्रकरणी १ लक्ष २६ हजार ५० रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. याचा बरोबर सदर ट्रैक्टर चालकास १० टक्के जिल्हा खनिज प्राधिकरण बाबतचा दंड देखील भरावा लागणार आहे. संबंधिताने दंडाची रक्कम न भरल्यावर पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला जाणार आहे. एवढेच नाहीतर हिमायतनगर शहर व परिसरात सध्या काही लोकांनी लाल रेतीचा बेकायदा धंदा सुरु केला आहे, नियमानुसार लाल रेतीची खरेदी विक्री करण्यास तहसिलने परवानगी दिली काय..? असा प्रश्नही पुढे येत आहे. याबाबत विचारानं केली असता परवानगी नसताना लाल रेतीची विक्री होत असेल तर संबंधित रेती विक्री करणाऱ्यावर कार्यवाही होऊ शकते अशी माहिती नायब तहसीलदार अनिल तामस्कर यांनी दिली.
हिमायतनगर तालुक्याला ७ कोटीचे महसूल वसुलीचे टार्गेट
हिमायतनगर तहसील अंतर्गत येणारी सर्व सज्जानी मिळून यावर्षी ७ कोटीचा महसूल वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अद्यापही हिमायतनगर तहसिलने ७ कोटींची वसुलीचे उद्दिष्ठ पूर्ण केलेले नाही. या वसुलीसाठी नियमानुसार मंडळ अधिकारी, तलाठी, व नायब तहसीलदार गौण खनिज तस्करावर कार्यवाही करत नसल्याने शासन व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करून रेती, रुम व दगडा सारख्या गौण खनिजाची चोरी सर्रास होते आहे. त्यामुळे शासनाचा कोट्यवधींचा महसूल बुडत असून, वसुलीचे टार्गेट पूर्ण होत नसल्याची बाब समोर आली आहे. हे वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तातडीने हिमायतनगर तालुक्यातील सर्वच रेती घाटाचे लिलाव करून महसूल वाढविणे गरजेचे आहे.
