कामारी रेतीघाटावरून राजकीय रेती माफियाकडून अवैध रेती उपसा सुरू

साठे असलेल्या ठिकाणच्या रेतीची खरेदी पावती तपासावी नसल्यास कार्यवाही करावी
हिमायतनगर प्रतिनिधी/तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या मौजे कामारी परिसरातील रेतीच्या घाटावरून राजकीय वरदहस्त असलेल्या रेती माफियाकडून अवैद्य रित्या रेतीचा उपसा केला जात आहे. या सर्व प्रकाराला येथील तलाठी, मंडळ अधिकाऱ्याच्या आशीर्वाद असल्याने रात्री अपरात्रीला चोरी करून रेतीचा धंदा करणारे अव्वाच्या सव्वा दराने विक्री करत आहेत. या रेती चोराचि तक्रार केल्यास अधिकारी उडवा उडवीची उत्तर देऊन रेती तस्करांकडून हप्ते घेत असल्याचा आरोप येथील सामान्य नागरिकातून केला आहे. हा प्रकार पाहता जिल्हाधिकारी डॉ.विपीन साहेबानी आपण दिलेल्या आदेशानुसार रेती साठे असलेल्या ठिकाणच्या रेतीची खरेदी पावतीची तपासणी. पावती नसल्यास संबंधितांवर शासन नियमाप्रमाणे कार्यवाही करावी तरच हिमायतनगर तालुका परिसरात होत असलेल्या रेतीच्या चोरीवर आला बसेल आणि शासनाच्या महसुलात वाढ होईल अशी रास्त आपेक्षा जागरूक नागरिक व्यक्त करत आहेत.
हिमायतनगर तालुक्याच्या काठावरून पैनगंगा नदी वाहते आहे, या नदीकाठावरून वाहणाऱ्या अनेक नदीकाठावरील गावा थडीपासून रेतीचा अहोरात्र उपसा करून काही रेतीमाफियांनी राजकीय वरदहस्ताचा वापर करत धुमाकूळ घातला आहे. असे असताना देखील याकडे तालुक्याचे अधिकारी आणि सज्जावर नेमलेले मंडळ अधिकारी व तलाठी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे गरजू घरकुल धारक लाभार्थ्यांना वाळू दादांच्या मनमानी भावाने रेती विकत घ्यावी लागते आहे. खरे पाहता जिल्हाधिकारी डॉ. विपीन यांनी हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावरील रेती घाटावर गतवर्षी रेती माफियांनी घातलेला धुमाकूळ लक्षात घेता लिलाव करून गोर गरिबांना रेती कमी भावात उपलब्ध करून देणे क्रमप्राप्त होते. मात्र आत्तापर्यंत एकही रेती घाटाचा लिलाव झाला नसल्याने पुन्हा एकदा रेती माफियांनी संबंधित सज्जाचे मंडळ अधीकारी, तलाठी व नायब तहसीलदार याना महिनेवारी हफ्ता ठरून आपल्या स्वतःच्या मालकीची पैनगंगा असल्याप्रमाणे अवैद्य रित्या रेती काढून साठेबाजी करत आहेत.

 याबाबत कोणी महसूलच्या अधिकारी - कर्मचाऱयांना तक्रार केली तर नदीत पाणी आहे, रेती काढता येत नाही असे सांगून वेळ मारून नेत आहेत. नदीपात्रात पाणी असताना देखील टायर आणि तराफ्याच्या माध्यमातून नदीपात्रातून रेती काढण्यासाठी काही रेती दादांनी तर बाहेरील माणसे आणलेली असल्याचे बोलले जात आहे. अश्या पद्धतीने नदीतून रेती काढून गरजू नागरिकांना मनमानी भावाने विक्री करून मालामाल होऊ पाहत आहेत. गतवर्षी दिवाळीनंतर या रेतीमाफियांनी हजारो ब्रास रेतीची चोरी करून शासनाला चुना लावला आहे.

याबाबत अनेक तक्रारी झाल्यानंतर पावसाळ्याच्या तोंडावर हिमायतनगर येथील महसूल अधिकाऱ्यांनी अनेक ठिकाणी कार्यवाहीचे ढोंग करत अनेक रेती साठे जप्त केले. मात्र त्या रेतीसाठ्याचा अद्याप लिलाव करण्यात आला नाही. त्यामुळे त्या जप्त रेती साठ्यापैकी अनेक ठिकाणच्या साठ्यातून रेतीची चोरी करून रेती माफियांनी आपले उखळ पांढरे केले आहे. त्यामुळेच कि काय..? जप्त रेती साठ्याचा लिलाव होत नाही. गतवर्षीचाच कित्ता गिरवीत यावर्षी देखील कामारी, वीरसनी, दिघी, एकंबा, धानोरा, कोठा, घारापुर, पळसपूर, सिरपल्ली, वारंगटाकळी, रेती घाटावरून राजकीय वरदहस्त असलेल्या येथील रेती चोरांना प्रशासनातील लाचखोर अधिकारी - कर्मचारी अभय देत असल्यामुळे जनता व शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून शासनाचा महसूल बुडवित रेतीचा गोरखधंदा चालविला जात आहे. रेतीची विक्री केलेली कोणतीही पावती ग्राहकास दिली जात नसल्याने हा सर्व प्रकार चोरीछिपे होत असल्याचे दिसते आहे.

यंदा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, त्यामुळे रेतीचा मोठा साठा नदीपात्रात जमलेला आहे. हीच संधी साधून रात्रंदिवस रेतीची चोरी करून शासनाला चुना लावण्याचे काम केले जात आहे. गरजूना मनमानी भावाने नाहीतर मोठ्या प्रमाणात रान शिवार आणि शहरातील काही खास ठिकाणी रेतीचा साठा केला जात आहे. हि बाब लक्षात घेऊन कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ विपीन यांनी हिमायतनगर तालुक्यातील नदीकाठावरील रेती घाटावरून होत असलेल्या रेतीच्या तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी अगोदर हिमायतनगर तालुक्यात अनेक वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या मंडळ अधिकारी, तलाठी व नायब तहसीलदारांची उचलबांगडी करून शासनाचा बुडणार महसूल वाचवावा. आणि जिथे कुठे बांधकाम सुरु आहे, त्या ठिकाणी आणि शेत शिवारात साठून असलेल्या रेतीच्या ढिगाऱ्याची तपासणी करून संबंधित मालकाकडे रेती खरेदी पावती आहे का..? याची तपासणी करावी अन्यथा संबंधितांवर शासन नियमानुसार कार्यवाही करावी अशी मागणी पर्यावरण तथा भर उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या जागरूक नागरीकातून केली आहे.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.